Join us  

Duleep Trophy : दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या दिवशी तिलक वर्मासह तिघांचा 'शतकी' कार्यक्रम

तिलक वर्मासह भारत 'ब' संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि भारत 'अ' संघातील प्रथम सिंगच्या शतकी खेळीचा समावेश आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 4:56 PM

Open in App

Duleep Trophy 2nd Round Day 3 Centuries : दुलिप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्यातील तिसऱ्या दिवशी तिघांच्या भात्यातून शतकी खेळी आल्याचे पाहायला मिळाले. यात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हैदराबादच्या तिलक वर्मासह भारत 'ब' संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि भारत 'अ' संघातील प्रथम सिंगच्या शतकी खेळीचा समावेश आहे. 

तिलक वर्माची नाबाद सेंच्युरी; त्याच्याआधी प्रथमनं साजरं केलं होत शतक    

शुबमन गिलच्या जागी भारत 'अ' संघात वर्णी लागलेल्या प्रथम सिंग याच्या भात्यातून तिसऱ्या दिवसातील पहिले शतक पाहायला मिळाले. तो तंबूत परतल्यानंतर याच संघाकडून खेळणाऱ्या तिलक वर्मानंही शतकी खेळी केली. तिलक वर्मानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १९३ चेंडूत १११ धावांची खेळी केली. यात त्याने ९ चौकार मारले. तिलक वर्माचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पाचवे शतक आहे. 

श्रेयस अय्यरच्या संघासमोर डोंगराएवढं लक्ष्य

 तिलक वर्मानं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपली क्षमता दाखवली आहे. आयपीएलमधील आश्वासक खेळीच्या जोरावर त्याने टीम इंडियातही एन्ट्री मारली होती. भारतीय संघाकडून तो चार वनडे सामन्यासह १६ टी-२० सामने खेळला आहे. प्रथम आणि तिलक वर्मा या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत 'अ' संघाने दुसऱ्या डावात ३ बाद ३८० धावा केल्या आहेत. या संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत 'ड' संघासमोर ४८८ धावांचे टार्गेट सेट केले आहे.

अभिमन्यू ईश्वरन यानंही साधला शतकी डाव

दुसऱ्या सामन्यात भारत 'ब' संघाचे नेतृत्व करणाऱ्या सलामी फलंदाज अभिमन्यू ईश्वरन याने तगडी खेळी केली.  भारत 'क' विरुद्धच्या लढतीत त्याने शतक साजरे केले. प्रथम श्रेणीतील त्याचे हे २४ वे शतक आहे. इशान किशनच्या भात्यातून आलं होतं दुसऱ्या टप्प्यातील पहिलं शतकदुलिप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात भारत 'क' संघाकडून खेळणाऱ्या इशान किशन याच्या भात्यातून पहिलं शतक पाहायला मिळाले होते. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत क संघाने पहिल्या डावात ५२५ धावा केल्या होत्या. इंडिया 'क' संघाला कडवी टक्कर देताना कॅप्टन ईश्वरन याने मोठी खेळी केली आहे.  भारत 'ब' आणि  भारत 'क' हे दोन्ही संघांनी पहिल्या टप्प्यात विजय मिळवला होता.  

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघतिलक वर्माइशान किशन