Join us  

६, ४, ६ अगदी तोऱ्यात साजरी केली फिफ्टी! टीम इंडियाच्या 'बापू'नं राखली श्रेयस अय्यरच्या संघाची लाज

पन्नाशीच्या आत संघाने ४८ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. मग अक्षर पटेलच्या भात्यातून आली क्लास इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 3:22 PM

Open in App

दुलिप कंरडक स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील इंडिया सी आणि श्रेयस अय्यरच्या इंडिया डी यांच्यातील सामना अंतपूरच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरेलल्या इंडिया डी संघाची अवस्था खूपच बिकट झाली होती. कॅप्टन श्रेयस अय्यरसह देवदत्त पडिकल आणि अन्य फलंदाजांनी नांगी टाकली. परिणामी पन्नाशीच्या आत संघाने ४८ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या.

 संकटमोचक अक्षर;  धुरंधर स्वस्तात माघारी फिरल्यावर खेळली मस्त अन् लक्षवेधी इनिंग

इंडिया डी संघासाठी शंभर धावाही मैलाचा पल्ला वाटत होत्या. पण संघ अडचणीत असताना अक्षर पटेलनं आपल्यातील अष्टपैलूत्वाचा नजराणा पेश केला. त्याने  ११८ चेंडूत ८६ धावांची उपयुक्त खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याच्या या खेळीच्या जोरावरच इंडिया डी संघानं कशी बशी १६४ धावांपर्यंत मजल मारली.

षटकार चौकाराच्या आतषबाजीसह साजरी केली फिफ्टी

दुलिप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात अक्षर पटेलनं षटकार, चौकार आणि षटकार या अंदाजा अर्धशतक पूर्ण केले. ७४ चेंडूत तो ३७ धावांवर खेळत होता. मग त्याने एकदमत गियर बदलला. मानव सुथारच्या गोलंदाजीवर त्याने षटकार, चौकार आणि षटकार मारत अगदी तोऱ्यात अर्धशतकाला गवसणी घातली. अक्षर पटेलला अर्शदीप सिंगनं मोलाची साथ दिली. त्याने ३३ चेंडूत १३ धावा केल्या.  

अय्यरचा संघ १६४ डावात ऑल आउट; यात निम्म्याहून अधिक धावा एकट्या अक्षरच्या

 ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील इंडिया सी संघाने अय्यरच्या संघाला पहिल्या डावात अवघ्या १६४ धावांत रोखले. कॅप्टनसह ६ जणांना एकेरी आकडाही गाठता आला नाही. यात अक्षर पटेलच्या एकट्याचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. अक्षर पटेल हा बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये उपयुक्त ठरणारा खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये चमक दाखवल्यानंतर गोलंदाजीतही तो कमालीची कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. दुलिप करंडक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात क्लास इनिंगसह अक्षर पटेलनं बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपली दावेदारी भक्कम केल्याचे दिसते. 

टॅग्स :अक्षर पटेलश्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ