भारताचा युवा विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेल सध्या चर्चेत आहे. कारण देशांतर्गत क्रिकेटमधील दुलिप करंड स्पर्धेतील सामन्यात तो अगदी हवेत झेपा झेपावून चेंडू पकडताना दिसतोय. एवढेच नाही तर सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत त्याने विकेट मागे महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केलीये.
या पठ्य़ानं साधली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
दुलिप करंडक स्पर्धेत भारत 'अ' संघाकडून विकेट किपर बॅटरच्या रुपात खेळणाऱ्या ध्रुव जुरेलनं अप्रतिम कॅचेस घेत सर्वांना थक्क करून सोडलं. यात आता त्याच्या खास विक्रमाची भर पडली आहे. विकेटमागे एका डावात सर्वाधिक झेल घेण्याचा पराक्रम करत त्याने भारताचा माजी आणि यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
७ कॅच घेणारा दुसरा विकेट किपर ठरला ध्रुव
बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात भारत 'ब' च्या दुसऱ्या डावात ध्रुवनं विकेट मागे खास किमया साधली. एका डावात त्याने ७ झेल टिपले. दुलिप करंडक स्पर्धेत एका डावात सर्वाधिक ७ झेल पकडण्याचा विक्रम याआधी महेंद्रसिंह धोनीच्या नावे होता. आता संयुक्तरित्या ध्रुव जुरेलही माहीला जॉईन झाला आहे.
धोनीनं कधी सेट केला होता हा विक्रम?
महेंद्रसिंह धोनी याने २००४-०५ च्या हंगामात दुलिप करंडक स्पर्धेत सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम सेट केला होता. धोनीनं ईस्ट झोनकडून खेळताना सेंट्रल झोन विरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला होता. धोनी या कामगिरीस सुनील बेंजामिन यांचा विक्रम मोडीत काढला होता. बेंजामिन यांनी १९७३ मधील दुलिप ट्रॉफीच्या फायनलमध्ये सेंट्रल झोनकडून खेळताना नॉर्थ विरुद्धच्या सामन्यात ६ झेलचा रेकॉर्ड होता.
तरीही संधी मिळणं मुश्किल
भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करेल. या मालिकेतून टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी अनेकजण दुलिप ट्रॉफी स्पर्धेत धडपडत आहेत. त्यामध्ये ध्रुव जुरेल हा देखील एक आहे. आता त्याने धोनीचा रेकॉर्डची बरोबरी केली असली तरी त्याला टीम इंडियात स्थान मिळणं मुश्किलच वाटते. कारण पंतनं आपल्यातील धमक दाखवून जवळपास आपली जागा पक्की केलीये. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संधी दिलीच तर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल असे वाटत नाही.
Web Title: Duleep Trophy 2024 Dhruv Jurel Equals MS Dhoni most catches taken by a wicket-keeper 20 Years Old Record Before Team India vs Bangladesh Test Series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.