दुलिप करंड स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात अनेक स्टार फलंदाजांनी नांगी टाकली असताना १९ वर्षांच्या पोरानं मैदान गाजवलं, मुशीर खान याने शतकी खेळीनं सर्वांच लक्षवेधून घेतलं आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या खेळीला सूर्यकुमार यादवनं दिलेली दाद चर्चेचा विषय ठरतीये.
शेर झाले ढेर; मुशीरनं लढवला किल्ला
दुलिप करंडक स्पर्धेतील भारत 'अ' आणि भारत 'ब' यांच्यातील सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना नावाजलेले गडी शेर ढेर झाल्यामुळं भारत 'ब' संघाची अवस्था अगदी केविलवाणी झाली होती. पण १९ वर्षाच्या पोरानं आपला रुबाब दाखवला. मुंबईकर मुशीर खान याने पहिल्या दिवशी शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे पहिल्या दिवसाअखेरी, भारत 'ब' संघ ७ बाद २०२ धावांवर होता. दुसऱ्या दिवशी मुशीरच्या नजरा द्विशतकावर होत्या. पण त्याचे द्विशतक हुकले. कुलदीप यादवनं त्याची विकेट घेतली. त्याने ३७३ चेंडूत १८१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
मुशीरच्या खेळीवर सूर्याही फिदा इन्स्टा स्टोरीतून व्यक्त केली मनातील भावना
मुशीरने नवदीप सैनीच्या साथीने महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला फक्त सावरले नाही. सामन्यात राहण्याचं बळ दिलं. पहिल्या दिवसाअखेर मुशीरने २२७ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०५ धावा* केल्या. यात सैनीने ७४ चेंडूत २९* धावांसह त्याला सुरेख साथ दिली. मुशीरची ही खेळी पाहून भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवही प्रभावित झाला आहे.त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून खास पोस्ट शेअर करत युवा क्रिकेटच्या खेळीच कौतुक केलं आहे.
नेमक काय म्हणाला सूर्या?
"व्हॉट नॉक मुशीर खान, नवदीप सैनीनं खूप चांगली साथ दिली. ड्यूटी नंतर रोज सराव, जितका वेळ ड्युटी तिकाच वेळ सराव " अशा शब्दांत सूर्यकुमार यादवनं मुशीर खानवर कौतुकाचा वर्षाव केलाय.