बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी अनेक दिग्गज देशांतर्गत क्रिकेटमधील दुलिप करंडक स्पर्धेत उतरले आहेत. भारतीय संघाकडून जलवा दाखवणाऱ्या अेनक खेळाडूंना पहिल्या दिवशी अपयश आले. यात यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, ऋतुराज गायकवाड आणि रजत पाटीदार ही मंडळी फ्लॉप ठरली होती. त्यात आता केएल राहुलच्या नावाचही समावेश झालाय.
KL राहुलनं शंभरहून अधिक चेंडू खेळले, पण...
लोकेश राहुल हा मैदानात तग धरुन थांबण्यात चांगलाच माहिर आहे. भारत 'अ' संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरल्यावरही त्याने आपल्यातील चिवट खेळीची झलक दाखवली. पण भारत 'ब' विरुद्धच्या या सामन्यात शंभरहून अधिक खेळून त्याला अर्धशतकापर्यंत पोहचता आले नाही. १११ चेंडूत त्याने ३७ धावा काढल्या. ज्यात ४ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे ही भारत 'अ' संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली.
सेट झाल्यावर असं कोण खेळतं व्हय? कसं व्हायचं सिलेक्शन
दुलिप करंडक स्पर्धेतील ही कामगिरी त्याला गोत्यात आणू शकते. लोकेश राहुलकडून या देशांतर्गत स्पर्धेत मोठ्या खेळीची अपेक्षा होती. तो वेळ घेत सेटही झाला होता. पण नको तो फटका मारण्याच्या नादात त्याने नाहक विकेट गमावली. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर स्विप खेळण्यासाठी तो ऑफ स्टंपच्याही खूप बाहेर आला होता. तो सहाव्या सातव्या स्टंपवर येऊन खेळला असे म्हणता येईल. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरनं अगदी अचूक टप्प्यावर चेंडू टाकून त्याला चकवा दिला. चेंडू लेग स्टंपवर आदळला. अन् केएल राहुलनं बाहेरचा रस्ता पकडला.
टीम इंडियातील सिलेक्शनसाठी मध्यफळीतील फलंदाजांची मोठी गर्दी
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी खूप मोठी शर्यत सुरु आहे. त्यात मध्यफळीतील फलंदाजांची मोठी गर्दी दिसून येते. रजत पाटीदार, सरफराज खान, श्रेयस अय्यर यांच्यामुळे आधीच केएल राहुल मागे पडतोय.. त्यात सेट झाल्यावर इतकं खराब शॉट सिलेक्शन करून विकेट फेकणं त्याच्यासाठी धोक्याची घंटाच ठरेल.