दुलिप करंडक स्पर्धेत भारत 'अ' संघाकडून शम्स मुलानी याने गुरुवारी लक्षवेधी खेळी केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत 'ड' संघाविरुद्ध त्याने पहिल्या दिवशी नाबाद ८८ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याच्या या खेळीच्या जोरावरच भारत 'अ' संघाने पहिल्या दिवसाअखेर ८ बाद २८८ धावा केल्या.शम्स मुलानीला खुणावतोय हा खास विक्रम
आघाडीच्या फलंदाजांनी निराश केल्यावर मुंबईकर ऑलराउंडरनं मैदानात तग धरून श्रेयस अय्यरच्या ताफ्यातील गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. शम्स मुलानी याने १७४ चेंडूचा सामना करत नाबाद ८८ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी त्याला १२ धावांसह खास रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी आहे. जर त्याने १२ धावा केल्या तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलं वहिलं शतक त्याच्या नावे होईल.
भारत 'अ' संघाच्या कॅप्टनसह या स्टार खेळाडूंनी टाकली नांगी
धावफलकावर अवघ्या ९५ धावा असताना भारत 'अ' संघाने आघाडीच्या पाच विकेट्स गमावल्या होत्या. यात सलामीवर प्रथम सिंग ७ (१३) आणि मयंक अग्रवाल ७(१४), तिलक वर्मा १०(३३), रियान पराग ३७ (२९) आणि शास्वस रावत १५ (१९) या खेळाडूंचा समावेश होता. शम्सला या दोघांनी दिली साथ, त्यात एकान साधला अर्धशतकी डाव
संघ अगदी अडचणीत असताना शम्स मुलानी मैदानात आला. त्याने आधी कुमार कुशाग्रच्या २८(६६) साथीनं डावाला आकार दिला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फुटल्यावर शम्स मुलानी आणि तनुष कोटियन ५३ (८०) ही जोडी जमली. या दोघांनी सातव्या विकेट्ससाठी ९१ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारत 'अ' संघाने ८ गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावा केल्या होत्या. ३०० पारसाठी संघाला जेवढ्या धावा हव्या आहेत तेवढ्याच धावा शम्स मुलानी याला शतकासाठी आवश्यक आहेत. खलील अहमदसोबत तो दुसऱ्या दिवसाच्या डावाची सुरुवात करेल. तळाच्या फलंदाजांसोबत तो शतकी डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.