दुलिप करंडक स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारत 'अ' विरुद्ध भारत 'ड' अशी रंगत पाहायला मिळथ आहे. भारत 'ड' संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत भारत 'अ' आघाडीला सुरुंग लावल्याचा सीनही पाहायला मिळाला.
रियान परागची लक्षवेधी फटकेबाजी
बांगलादेश विरुद्धच्या कसोटीसाठी शुबमन गिलला रिलीज केल्यानंतर मयंक अग्रवाल भारत 'अ' संघाचे नेतृत्व करत आहे. प्रथम सिंगसोबत त्यानेच आपल्या संघाच्या डावाला सुरुवात केली. पण ही सलामी जोडी प्रत्येकी ७-७ धावा करुन तंबूत परतली. एकापाठोपाठ एक विकेट पडत असताना रियान परागनं आपल्या भात्यातील आक्रमक फटकेबाजीनं संघाला थोडा दिलासा दिला. त्याने आपल्या इनिंगमध्ये काही सुरेख फटके खेळले. पण सेट होऊनही तो मोठी खेळी करायला चुकला.
अर्शदीपनं दिली खुन्नस, रियानची विकेट घेतल्यावर बघण्याजोगा होता त्याचा अंदाज
भारत 'ड' संघाकडून खेळणाऱ्या रियान पराग याने १०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या. २९ चेंडूत ३७ धावांच्या आपल्या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ अप्रतिम षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. तो मोठी खेळी करेल असे वाटत असताना अर्शदीप सिंगने त्याचा खेळ खल्लास केला. रियान परागची विकेट घेतल्यावर अर्शदीप सिंग याने खुन्नस दाखवत आक्रमक अंदाजात सेलिब्रेशनही केल्याचे पाहायला मिळाले.
एवढा का खवळला होता अर्शदीप सिंग
रियान परागच्या विकेट्सवर अर्शदीप एवढा का आक्रमक झाला? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. त्यामागचं कारण रियान परागच्या आक्रमक खेळीत दडलं आहे. बाद होण्यापूर्वी तोऱ्यात खेळणाऱ्या रियान परागनं अर्शदीप सिंगलाही तीन खणखणीत चौकार मारले होते. याचाच राग काढत त्याने विकेट घेतल्यावर जोरदार सेलिब्रेशन केल्याचा सीन पाहायला मिळाला. अर्शदीप सिंग याने भारत 'ड' संघाकडून सुरेख गोलंदाजी केली. भारत 'अ' विरुद्धच्या सामन्यात रियान परागशिवाय त्याने कुमार कुशाग्र याची विकेट आपल्या खात्यात जमा केली.