Ishan kishan Duleep Trophy: टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडत असलेल्या इशान किशनची अचानक दुलिप करंडक स्पर्धेतील सामन्यात एन्ट्री झाल्याचा सीन पाहायला मिळाला. पहिल्या टप्प्यात दुखापतीमुळे त्याने माघार घेतली होती. दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठीही त्याचे नाव कोणत्याच संघात नव्हते. पण भारत भारत 'ब' आणि भारत 'क' यांच्यातील टॉस झाला अन् इशान किशन हा भारत क संघाकडून खेळणार हे स्पष्ट झाले.
अन् इशान किशन यानं अगदी तोऱ्यात साजरी केली सेंच्युरी
टॉसनंतर थेट संघात स्थान मिळवलेल्या इशान किशन याने शानदार शो दाखवत डोळ्याचं पारण फेडणारी खेळी करून पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅकसाठी आतुर असल्याचे संकेत देणारी खेळी केली. तोऱ्यात अर्धशतक झळकवल्यावर तेवढ्यावरच न थांबता इशान किशन याने शानदार सेंच्युरी झळकावली. १४ चौकार आणि २ षटकार मारत त्याने शतकाला गवसणी घातली.
दुखापतीमुळे पहिल्या फेरीतील लढतींना मुकला इशान
त्याची दुलिप ट्रॉफी स्पर्धेत अचानक झालेली एन्ट्री अनेकांना गोंधळात पाडणारी होती. कारण याआधी बीसीसीआयने दुखापतीमुळे तो खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण दुखापतीतून सावरल्याची कोणतीही बातमी न देता त्याला थेट संघात घेण्यात आले. बीसीसीआयनं याआधी इशान किशनसंदर्भात दिलेल्या अपडेट्सनुसार, ऑल इंडिया बुची बाबू स्पर्धेत कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे तो पहिल्या टप्प्यातील सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती देण्यात आली होती. बीसीसीआयने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची निवड केल्यावर दुलिप करंडक स्पर्धेतील चार संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंची सुधारीत निवड यादी जाहीर केली होती. त्यातही इशान किशनच्या नावाचा समावेश नव्हता.
विकेट किपर बॅटरच्या नव्हे तर फलंदाजाच्या रुपात भारत 'क' संघात लागली वर्णी पण १२ सप्टेंबरला इशान किशन याने कोणत्याही संघात नाव नसताना थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाली. भारत क संघाकडून तो विकेट किपर बॅटर नव्हे तर फलंदाजाच्या रुपात मैदानात उतरला. आर्यन जुयालच्या जागी त्याची संघात निवड करण्यात आली.
पाठोपाठ चुकीचे निर्णय घेतल्यामुळे आला होता गोत्यात
मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून अचानक ब्रेक घेतल्यामुळे इशान किशन गोत्यात आला होता. बीसीसीआयच्या सूचनेनंतरही रणजी ट्रॉफीपासून दूर राहणं त्याला महागात पडलं होते. बीसीसीआयच्या वार्षिक करारातून त्याचं नाव गायब झालं. आता पुन्हा टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी त्याने धमाकेदार प्रयत्नासह सुरुवात केल्याचे दिसते. त्याचे फळं त्याला कधी मिळणार ते येणारा काळच ठरवेल.