Duleep Trophy, Ruturaj Gaikwad Retired Hurt : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी दुलिप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील लढती सुरु झाल्या आहेत. अनंतपूरच्या मैदानात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' विरुद्ध अभिमन्यू ईश्वरन याच्या नेतृत्वाखालील भारत 'ब' यांच्यात सामना रंगला आहे.
ऋतुराज गायकवाडवर आली रिटायर्ड हर्ट
भारत 'ब' संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऋतुराजच्या संघावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. साई सुदर्शनच्या साथीनं त्याने डावाला सुरुवातही केली. दोन चेंडूचा सामना करताना एक खणखणीत चौकारही त्याच्या भात्यातून पाहायला मिळाला. पण अचानकच ऋतुराज गायकवाड रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. नेमकं त्याला झालंय तरी काय?
ऋतुराज गायकवाड हा बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी संघाचा भाग नाही. पण बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो टीम इंडियात दिसू शकतो. अचानक मैदान सोडल्यामुळे तो दुखापतीनंग्रस्त असावा हे लक्षात येण्याजोगे आहे. पण त्याला नेमकं काय झालं आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडू शकतो. ऋतुराज गायकवाडसंदर्भात जी माहिती समोर येतीये त्यानुसार, धावताना घोट्याजवळ पाय मुरगळल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली आहे, असे समजते. अधिकृतरित्या त्याच्या दुखापतीसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण त्याची ही दुखापत फार गंभीर नसून दुसऱ्या डावात तो पुन्हा मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे.
पहिल्या बॉलवर खणखणीत चौका, दुसऱ्या बॉलनंतर खेळ थांबला!
दुलीप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडनं अगदी तोऱ्यात भारत क संघाच्या डावाची सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर त्याने खणखणीत चौकार ठोकला. तो या सामन्यात चमक दाखवणार, याचे संकेत मिळाले असताना दुसरा चेंडू खेळल्यावर त्याला दुखापतीमुळे तंबूत परतावे लागले.