दुलिप करंडक स्पर्धेतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटर या देशांतर्गत स्पर्धेत धमक दाखवून टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनंतपूरच्या रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया डी आणि ऋतुराज गायकवडच्या कॅप्टन्सीत इंडिया सी यांच्यात सामना सुरु आहे.
इंडिया डी संघाची खराब सुरुवात; ३४ धाावांत अर्धा संघ परतला तंबूत
ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया डी संघानं अवघ्या ३४ धावांत ५ विकेट्स गमावल्या. अथर्व तायडे आणि यश दुबे यांनी इंडिया डी संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या ४ धावा असताना अथर्वच्या रुपात इंडिया डी संघाला पहिला धक्का बसला. तो ५ चेंडूत ४ धावा करून तंबूत परतला. अंकुश कंबोज याने त्याची विकेट घेतली. यश दुबेनं १२ चेंडूत १० आणि रिकी भुईनं १३ चेंडूत ४ धावा करत तंबूचा रस्ता धरला.
कॅप्टन श्रेयस अय्यरनं अनकॅप्ड गोलंदाजासमोर टेकले गुडघे
पहिली विकेट गेल्यावर कॅप्टन श्रेयस अय्यर मैदानात आला. त्याच्याकडून संघाला सावरणाऱ्या खेळीची अपेक्षा होती. पण अनकॅप्ड विजय कुमार वैश्यकसमोर तो फेल ठरला. १६ चेंडूचा सामना करून अवघ्या ९ धावा करत श्रेयस अय्यर तंबूत परतला. देवदत्त पडिक्कल हा देखील या सामन्यात नावाला साजेसा खेळ करू शकला नाही. विजय कुमार वैश्यकनं त्याला खातेही उघडू दिले नाही.
श्रीकर भरत आणि अक्षर पटेलवर नजरा
इंडिया डी संघ चांगलाच अडचणीत आला असून आता या संघाची मदार विकेट किपर बॅटर श्रीकर भरत आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांच्यावर असेल. संघाला सुस्थितीत घेऊन जाण्यासाठी ते कितपत यशस्वी ठरणार ते पाहण्याजोगे असेल. इंडिया सी संघाकडून अंकुश कुंबोज, वैश्यक यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय हिमांशू चव्हाण याला एक विकेट मिळाली.