Shreyas Iyer Duck In Duleep Trophy 2024: श्रेयस अय्यर हा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो फिट बसतो, असेही बोलले गेले. एवढेच काय तर काहीजण त्याला भविष्यातील टीम इंडियाच्या कॅप्टनच्या रुपातही पाहू लागले. पण सध्या या गड्याची अवस्था ही 'ना घर का ना घाट का' अशी काहीशी झालीये.
धावा होईनात, श्रेयस अय्यरच्या पदरी पडला भोपळा
टीम इंडियातील त्याचे स्थान डळमळीत झाले आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी दुलिप करंडक स्पर्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाची बनली आहे. या देशांतर्गत स्पर्धेत तो भारत 'ड' संघाचे नेतृत्वही करताना दिसतोय. पण त्याचे कर्तृत्व मात्र शून्यच आहे. सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून पत्ता कट झालेल्या श्रेयस अय्यरवर भारत 'अ' विरुद्धच्या सामन्यातही शून्यावर बाद होण्याची वेळ आली.
खलील अहमदनं घेतली त्याची विकेट
पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर कॅप्टन संघाचा डाव सावरेल, अशी अपेक्षा होती. श्रेयस अय्यरनं ७ चेंडूचा सामना करत संयम दाखवण्याची तयारी दर्शवली. पण शेवटी त्याच्या पदरी भोपळाच आला. खलील अहमदच्या गोलंदाजीवर खातेही न उघडता त्याला तंबूत परतावे लागले.
पहिल्या सामन्यातही ठरला होता अपयशी
याआधीच्या सामन्यातही श्रेयस अय्यरला आपली छोप सोडण्यात अपयश आले होते. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात तो अवघ्या ९ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने ५४ धावांची खेळी करत लयीत परतत असल्याचे संकेत दिले. पण दुसऱ्या सामन्यात पुन्हा त्याला खाते उघडण्यात अपयश आले. अपयश त्याची पाठ सोडायला तयार नाही, असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.
श्रेयस अय्यरची कसोटीतील कामगिरी
श्रेयस अय्यरने भारतीय संघाकडून १४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याच्या खात्यात एक शतक आणि ४ अर्धशतकाच्या मदतीने ८११ धावा जमा आहेत. श्रेयस अय्यरने अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी २०२४ मध्ये खेळला होता. यावेळीही त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. त्यामुळे त्याने टीम इंडियातील स्थानही गमावले होते.
सनग्लासेस घालून बॅटिंगला आला होता अय्यर
क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाने सनग्लासेस घालून मिरवणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण फार कमी वेळा फलंदाज सनग्लासेस घालून फलंदाजी करताना दिसून येते. श्रेयस अय्यरही सनग्लासेस घालून फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याचा उद्देश हा शायनिंग मारण्याचा मुळीच नव्हता. उन्हापासून संरक्षणासाठी त्याने सनग्लासेसचा आधार घेतला असावा. पण तो शून्यावर बाद झाल्यामुळे हिरोसारखा आला अन् झिरो ठरला असा काहीसा सीन क्रिएट झाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर यावरून त्याला ट्रोलही करण्यात येत आहे. शून्यावर आउट झाल्यामुळे त्याच्यावर जणू तोंड लपवण्याची वेळच आली.