रिषभ पंतनं दुलिप करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात खणखणीत चौकार मारून खाते उघडले. संघ अडचणीत असताना मैदानात तग धरून तो संघाचा डाव सावरेल, असे वाटत होते. पण झाले ते वेगळेच. रेड बॉल क्रिकेटमध्ये टी-२० क्रिकेटच्या अंदाजात चुकीच्या वेळी मारलेल्या चुकीच्या फटक्यामुळे त्याने आपली विकेट अगदी स्वस्तात गमावली.
हवेत फटकेबाजी करण्याचा डाव फसला, शुबमन गिलनं घेतला सुरेख कॅच
दुलिप करंडक स्पर्धेतील सामन्यात रिषभ पंतवर सर्वांच्या नजरा होत्या. या स्पर्धेत इंडिया बी संघाकडून खेळणारा विकेट किपर बॅटर रिषभ पंत जवळपास २ वर्षांनी रेड बॉल क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. इंडिया ए विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर चौकार मारत त्याने आपले खाते उघडले. पण आकाश दीपच्या गोलंदाजीवर हवेत फटकेबाजी करण्याचा त्याचा डाव फसला. इंडिया एचा कॅप्टन शुबमन गिलनं अप्रतिम झेल पकडत पंतचा खेळ खल्लास केला. पंत १० चेंडूत ७ धावा करुन परतला.
पहिल्या डावात फ्लॉप शो
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. दुखापतीतून सावरताना कमालीची रिकव्हरी करत त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यात यशस्वी कमबॅक करून दाखवले. आता कसोटी क्रिकेटमधील फिटनेस सिद्ध करण्यासाठी त्याला दुलिप करंडक स्पर्धेत धमक दाखवावी लागणार आहे. यातील पहिल्या सामन्यात बॅटिंगमध्ये तो फोल ठरलाय. विकेट मागे त्याची कामगिरी कशी राहणार ते देखील पाहावे लागेल.
पंतशिवाय यशस्वीसह सरफराज ठरला अयशस्वी
दुलिप करंडक स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरले आहेत. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात एन्ट्रीसाठीचा हा दरवाजाच आहे. पण पहिल्या सामन्यात पंतसह अन्य स्टार खेळाडूंच्या पदरी सपशेल अपयश आल्याचे दिसते. पंत ज्या इंडिया बी संघाकडून खेळतो त्या संघातील यशस्वी जयस्वालही ३० धावांपर्यंत मजल मारू शकला. सरफराज खान तर ३५ चेंडू खेळला पण त्याला फक्त ९ धावांच करता आल्या.