दुलिप करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरलेल्या रिषभ पंतन दुसऱ्या डावात कहर केला. पंतने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेत पंत भारत 'ब' संघाकडून मैदानात उतरला आहे. पहिल्या डावात त्याने आक्रमक अंदाजात सुरुवात केली होती. पण चौकारानं खात उघडणाऱ्या पंतला अवघ्या ७ धावांवर तंबूत परतावे लागले होते. यावेळी मात्र त्याने ५० पेक्षा अधिक धावा करत कसोटी संघात कमबॅकसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
आधी विकेटमागे दाखवला जलवा
पहिल्या डावातील बॅटिंगमधील अपयश भरून काढण्याची सुरुवात त्याने विकेटमागील सर्वोत्तम कामगिरीनं सुरु केली. भारत 'अ' संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल आणि रियान पराग या दोघांचे झेल त्याने टिपल्याचे पाहायला मिळाले. यातील मयंक अग्रवालचा त्याने घेतलेला झेल अप्रतिम आणि पंत टेस्टसाठीही फिट आहे, ते दाखवून देणारा होता.
पंतनं ४७ चेंडूत कुटल्या ६१ धावा
पंतनं आपल्या दुसऱ्या डावातील खेळीत ४७ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६१ धावा कुटल्या. तनुष कोटियन याने त्याच्या खेळीला ब्रेक दिला. पण तोपर्यंत त्याने संघासाठी आवश्यक ती जबाबदारी पार पाडली होती. रिषभ पंत याने २०२२ मध्ये बांगलादेश विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर अपघातानंत झालेल्या गंभीर दुखापतीतून सावरत त्याने मर्यादीत षटकांच्या सामन्यात कमबॅक केले. आता देशांतर्गत सामन्यात धमक दाखवून बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. फिफ्टी मारत त्याने आपल्या जागेवर 'रुमाल टाकला' आहे, असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.
सामन्याचा निकाल काय लागणार यापेक्षा पंतच्या खेळीवर होतीये चर्चा
भारत 'ब' संघाकडून पंत शिवाय सरफराज खान यानेही ३६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाअखेर भारत 'ब' संघाने ६ बाद १५० धावा करत २४० धावांची आघाडी घेतली होती. अखेरच्या दिवशी या सामन्याचा निकाल लागणार की, सामना अनिर्णित राहणार ही गोष्टही बघण्याजोगी असेल. पण तुर्तास या डावात पंतनं पुन्हा कमबॅकसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.