भारताचा स्टार विकेट किपर बॅटर रिषभ पंत मैदानातील आपल्या जबरदस्त कामगिरीशिवाय आपल्या हटके अंदाजानंही चर्चेत असतो. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात रंगलेल्या भारत 'अ' आणि भारत 'ब' यांच्यातील सामन्यादरम्यान पंतचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. तो ज्या शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघाविरुद्ध मैदानात उतरला होता. त्यांच्या घोळक्यात शिरून प्रतिस्पर्धी संघ काय रणनिती आखतोय? ते पंत जाणून घेताना दिसला. त्याचा हा मजेशीर अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नेमक काय घडलं? इथं पाहा व्हिडिओ
बीसीसीआय डोमॅस्टिक X अकाउंटवरुनही पंतचा हा व्हिडि शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये चौथ्या दिवसाच्या खेळ सुरु होण्याआधी भारत 'अ' संघाचा कॅप्टन शुबमन गिल टीम हर्डलमध्ये संघातील सहकाऱ्यांशी चर्चा करताना दिसते. यादरम्यान रिषभ पंतही या घोळक्यात सामील होतो. भारत 'अ' संघातील सर्व खेळाडू मैदानात जात असताना तो मैदानाबाहेर येताना दिसते. यावेळी प्रतिस्पर्धी संघाकडून खेळणाऱ्या आवेश खानलाही तो टाळी देताना दिसून येते.
पंतसाठी खूप महत्त्वाची होती ही स्पर्धा
रिषभ पंतसाठी दुलिप करंडक स्पर्धा खूप महत्त्वाची होती. कारण २०२२ पासून तो कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियात वर्णी लावण्यासाठी त्याला या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करायचे होते. पहिल्या डावात बॅटिंगमध्ये तो फेल गेला. पण दुसऱ्या डावात त्याने त्याची भरपाई केली.
आपल्या स्टाईलमध्ये खेळत संघाला सावरलं, टीम इंडियातील कमबॅकची दावेदारीही फक्की
पहिल्या डावात फक्त ७ धावा करून माघारी फिरलेल्या पंतनं दुसऱ्या डावात जबरदस्त खेळी केल्याचे पाहायला मिळाले. ३ बाद २२ अशी अवस्था असताना पंत मैदानात उतरला. त्याने आपल्या अंदाजात बॅटिंग करत संघाला संकटातून बाहेर काढले. ३४ चेंडूत अर्धशतक झळकवणाऱ्या पंतनं ४७ चेंडूत 9 चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. संघाकडून ही सर्वोच्च खेळीही ठरली. या कामगिरीसह तो आता टीम इंडियात दिसणार हे जवळपास पक्कं आहे.