Join us  

हिंमतीनं लढत ऋतुराज गायकवाडनं झळकावली फिफ्टी; मात्र संजूची झोळी इथंही रिकामीच

असे काही स्टार खेळाडू आहेत जे पुन्हा पुन्हा मिळालेल्या संधीच सोन करायला चुकल्याचे दिसते. यात आता संजू सॅमसनच्या नावाची देखील भर पडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 5:09 PM

Open in App

Duleep Trophy 2024 : दुलिप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात अनेक स्टार क्रिकेटर धमक दाखवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. एका बाजूला इशान किशन याने दमदार खेळीचा नजराणा पेश करत निवडकर्त्यांना आपल्याबद्दल विचार करायला भाग पाडले. दुसरीकडे असे काही स्टार खेळाडू आहेत जे पुन्हा पुन्हा मिळालेल्या संधीच सोन करायला चुकल्याचे दिसते. यात आता संजू सॅमसनच्या नावाची देखील भर पडली आहे.

संजू सॅमसनला नशिबानं मिळाली होती संधी, पण...

दुलिप करंडक स्पर्धेत कोणत्याच संघात संजू सॅमसनचा समावेश नव्हता. पण इशान किशन दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यातून आउट झाल्यावर त्याच्या जागी संजू सॅमसन याची या स्पर्धेत वर्णी लागली. ज्याप्रमाणे टीम इंडियात वर्णी लागल्यावर तो आपल्यातील धमक दाखवून देण्यात कमी पडला अगदी तोच सीन आता पुन्हा पाहायला मिळाला आहे. कारण सरप्राइजरित्या मिळालेल्या संधी सोन करण्यात तो अपयशी ठरला आहे. संजू सॅमसन हा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत 'ड' संघाकडून मैदानात उतरला होता. भारत अ संघाविरुद्धच्या सामन्यात ६ चेंडूत ५ धावा करून तो तंबूत परतला. आयपीएलमध्ये संजू सॅमसन अगदी जबरदस्त खेळत असला तरी टीम इंडियाकडून खेळताना त्याच्यात सातत्याचा अभाव दिसून आला आहे. तो टीम इंडियाकडून १६ वनडे आणि ३० टी-२० सामने खेळला असून एकाही कसोटी सामन्यात त्याला संधी मिळालेली नाही.

ऋतुराज गायकवाडनं दाखवली हिंमत

एका बाजूला संजू सॅमसनचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. दुसरीकडे भारत 'ब' विरुद्धच्या सामन्यात  भारत 'अ' संघाचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने दमदार अर्धशतक झळकावले. दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झालेल्या ऋतुराजने पुन्हा मैदानात येऊन हिंमतीने खेळल्याचे पाहायला मिळाले. त्याने ७४ चेंडूत ५८ धावांची खेळी केली.  

टॅग्स :ऋतुराज गायकवाडसंजू सॅमसनभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ