भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मासह स्टार बॅटर विराट कोहली दुलीप दुलीप कंरडक स्पर्धेत (Duleep Trophy) खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगली होती. टीम इंडियात खेळायचं तर देशांतर्गत क्रिकेटही खेळा, असा कठोर पवित्रा घेणाऱ्या बीसीसीआयनं रोहित-विराटसह काही मंडळींना झुकतं माप दिलं आहे.
मोजकी मंडळी सोडली, तर अनेक स्टार्संची लागलीये वर्णी
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या ही मोजकी नावे सोडली तर बहुतांश खेळाडू देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. लिटल मास्टर सुनील गावसकरांनी या मुद्यावरून रोहित शर्मा आणि विराट कोहलीसंदर्भातील निर्णय खटकल्याचे मत व्यक्त केले आहे.
गावसकरांनी वाढत्या वयाचा दाखला देत हाणला रोहित-विराटला टोला
गावसकरांनी वाढत्या वयाचा दाखला देत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांचे कान टोचल्याचे दिसते. या दोघांचेही वय वाढत आहे. फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी अधिकाधिक क्रिकेट खेळण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे. दोघांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यावर्षी भारतीय संघ फार वनडे खेळणार नाही. आगामी कसोटी सामन्यांचे वेळापत्रक लक्षात घेता, या दोघांनी दुलीप करंडक स्पर्धेत सहभागी व्हायला हवे होते, असे गावसकरांनी म्हटले आहे.
गावसकरांनी मिड-डे ला लिहिलेल्या स्तंभ लेखात (कॉलम) म्हटलंय की,
निवडकर्त्यांनी कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची दुलीप करंडक स्पर्धेसाठी निवड केलेली नाही. त्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत ते सरावाशिवायच मैदानात उतरतील. जसप्रीत बुमराह याला पाठीच्या दुखापतीपासून दूर ठेवण्यासाठी त्याला विश्रांती देणं समजू शकते. पण फलंदाजांना काही वेळ बॅटिंगचा सराव करणं गरजेचे असते. ज्यावेळी एखादा खेळाडू वयाची तिशी पार करतो त्यावेळी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नियमित खेळणं अधिक गरजेचे होऊन जाते. ते फलंदाजाच्या दृष्टीने अधिक फायद्याचे ठरते. जर मोठे अंतर निर्माण झाले तर स्नायू कमकुवत होतात. सर्वोच्च स्तराचा खेळ करणं अधिक अवघड होते.
मोठा ब्रेक या दोन दिग्गजांच्या अडचणी वाढवू शकतो
श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना ४३ दिवसांचा मोठा ब्रेक मिळाला आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहित विराट दुलीप करंडक स्पर्धेत खेळले असते तर त्याचा संघाला फायदाच झाला असता, हीच गोष्ट गावसकरांनी बोलून दाखवली आहे. मनात असेल तर खेळा नाहीतर ब्रेक घ्या, हे झुकतं माप आगामी काळात या जोडीला अडचणीत आणू शकते, यावरच गावसकरांनी जोर दिल्याचे दिसते.