Duleep Trophy 2024-25 : देशांतर्गत क्रिकेटमधील दुलिप करंडक स्पर्धेत टीम इंडियातील अनेक स्टार मैदानात उतरणार असा गाजावाजा झाला. स्पर्धा सुरु होण्याआधीच काही गडी या स्पर्धेतून आउट झाल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादव मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा यांच्यानंतर इशान किशनंही पहिल्या फेरीतील सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. उर्वरित स्पर्धातही हे चित्र पाहायला मिळालं तर इशानचं टेन्शन वाढू शकते.
काही महिन्यांपासून कमबॅकसाठी धडपडतोय इशान किशन
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेतून अचानक माघार घेतल्यापासून तो टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे दुलीप करंडक स्पर्धा त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात होती. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच त्याने माघार घेतल्याची दिसते. इशान किशनची इंडिया डी संघात वर्णी लागली होती. या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसणार आहे.
या कारणामुळे स्पर्धेतील काही सामन्याला मुकण्याचे संकेत
या स्पर्धेआधी इशान किशन हा बुची बाबू स्पर्धेत झारखंड संघाकडून मैदानात उतरला होता. या सामन्यावेळी त्याला स्नायू दुखापतीची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे त्याने दुलीप करंडक स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात खेळणार नसल्याची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली आहे. इशान किशनच्या जागी कोण खेळणार? असा प्रश्नही त्यामुळे चर्चेत आहे. बीसीसीआयने अद्याप यासंदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्याच्या घडीला इंडिया डी संघात केएस भरत विकेट किपर बॅटरचा पर्याय आहे. इशानच्या जागी संजू सॅमसनची या संघात एन्ट्री होऊ शकते.
सूर्यासह या खेळाडूंवर आली आहे स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ
इशान किशन आधी सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आगामी स्पर्धेतील काही सामन्याला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. याशिवाय मोहम्मद सिराज, उमरान मलिक या जलदगती गोलंदाजांशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा या स्टार खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली होती.