कोईम्बतूर येथे दुलीप चषक स्पर्धेतील पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग ( West Zone vs Central Zone) असा सामना सुरू आहे. पृथ्वी शॉ व राहुल त्रिपाठी यांची अर्धशतकं व शॅम्स मुलानी व तनूष कोटीयन यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर वेस्ट झोनने २५७ धावा उभ्या केल्या. कुमार कार्तिकेयाने ६६ धावा देताना ५ विकेट्स घेऊन वेस्ट झोनचे कंबरडे मोडले. कर्णधार अजिंक्य रहाणे ८ धावांवर बाद झाला. अनिकेत चौधरीनेही दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात सेंट्रल झोनचा निम्मा संघ ७७ धावांत माघारी परतला आहे. त्यात मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नेट बॉलर आणि कोलकाता नाइट रायडर्सचा हुकमी अष्टपैलू खेळाडू याला अॅम्बूलन्समधून मैदानाबाहेर नेण्याची वेळ आली.
प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल ( ०), अजिंक्य ( ८) हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉ व राहुल त्रिपाठी यांनी वेस्ट झोनचा डाव सावरला. पृथ्वीने ७८ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या, तर राहुलने १५१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६७ धावा जोडल्या. अरमान जाफर २३ धावांवर माघारी परतला अन् पुन्हा वेस्ट झोनचा डाव गडगडला. मुलानीने ४१ व कोटियनने ३६ धावा करून वेस्ट झोनला २५७ धावांपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात जयदेव उनाडकटनेही कमाल केली .त्याने त्याच्या १० षटकांत ३ विकेट्स घेताना सेंट्रल झोनचा निम्मा संघ ६६ धावांवर माघारी पाठवला. KKR चा स्टार वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) फलंदाजी करत असताना चिंतन गाजाच्या गोलंदाजीवर चेंडू त्याला लागला अन् तो वेदनेने कळवळला. ताबडतोब मैदानावर अॅम्बूलन्स बोलावण्यात आली, स्ट्रेचरही आणले. पण, वेंकटेश स्वतः चालत अॅम्बूलन्समध्ये जाऊन बसला. पुढील उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.