भारताचा स्टार फलंदाज सरफराज खान याच्या धाकटा भाऊ मुशीर खान याने दुलिप कंरडक स्पर्धेतील सामन्यात शतक झळकावले आहे. इंडिया ए आणि इंडिया बी यांच्यातील सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.
थोरल्या भावाचा फ्लॉप शो; धाकट्यानं मारली सेंच्युरी
मुशीर खान आणि त्याचा थोरला भाऊ सरफराज खान हे मुंबईकर या स्पर्धेत इंडिया बी संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसत आहेत. इंडिया ए विरुद्धच्या सामन्यात एका बाजूला भाऊ ३५ चेंडू खेळून फक्त ९ धावा करून परतला. तिथं धाकड्या भावानं आपला धाक दाखवून दिला. २०५ चेंडूत त्याने शतकाला गवसणी घातली. यंदाच्या हंगामातील दुलिप कंरडक स्पर्धेतील हे पहिलं शतक आहे. रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड ही स्टार मंडळी गडबडली असताना १९ वर्षीय युवा मुशीरनं खास छाप सोडली आहे.
मुशीरशिवाय फक्त तिघांनी पार केला दुहेरी आकडा
मुशीर खानच्या शतकी खेळीच्या जोरावर इंडिया बी संघाने २०० धावांचा आकडा पार केला आहे. त्याच्याशिवाय यशस्वी जयस्वाल ३०, कर्णधार अभिमन्यू ईश्वरन १३ आणि नवदीप सैनी २९ धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील इंडिया ए संघाकडून खलील अहमद, आकाश दीप आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
गोलंदाजांचा दबदबा
दुलिप कंरडक स्पर्धेतील दोन्ही सामन्यात गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. इंडिया सी आणि इंडिया डी यांच्यातील लढतीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया डी संघ पहिल्या डावात १६४ धावांत आटोपल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर इंडिया सी या संघाची सुरुवातही काही बरी झाली नाही. कॅप्टन ऋतुराजसह आयपीएल स्टार साई सुदर्शन, रजत पाटीदार ही मंडळी स्वस्तात माघारी फिरली. या सामन्यात अक्षर पटेलनं इंडिया डी कडून सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली.