Duleep Trophy Updated Points Table : दुलिप करंडक २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील लढतीचे निकाल समोर आले आहेत. दुसऱ्या फेरीत मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत 'ड' संघाला १८६ धावांनी मात दिली. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' विरुद्ध अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील भारत 'ब' यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या फेरीतील दोन लढतीच्या निकालानंतर दुलिप करंडक स्पर्धेतील गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
ऋतुराजच्या कॅप्टन्सीची हवा; ईश्वरनही त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर
ऋतुराज गायकवाडच्या भारत 'क' संघाचा सामना अनिर्णित राहिला असला तरी गुणतालिकेत हा संघ टॉपला आहे. त्यांच्या खात्यात ९ गुण जमा आहेत. भारत 'क' विरुद्धची लढत अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरलेला अभिमन्यू ईश्वरन याच्या नेतृत्वाखालील भारत 'ब' संघ गुणतालिकेत ७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रेयस अय्यरच्या संघाच्या पदरी भोपळा!
या स्पर्धेतील एक विजय आणि एका पराभवासह मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघ ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ चौथ्या क्रमांकावर म्हणजे अगदी तळाला आहे. भारत 'ड' संघाच्या खात्यात एकही गुण दिसत नाही. हा एकमेव संघ आहे ज्याला दुलिप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील लढतीनंतरही खाते उघडता आलेले नाही. भारत ड संघाला अ विरुद्धच्या लढती आधी पहिल्या फेरीत भारत क संघाने शह दिला होता.
तिसऱ्या टप्प्यानंतर ठरेल दुलिप करंडक स्पर्धेचा विजेता
दुलिप करंडक स्पर्धेत एकूण तीन टप्प्यात लढती खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान चार संघांना प्रत्येकासोबत खेळण्याची संधी मिळेल. तिसऱ्या टप्प्यातील लढतीनंतर जो संघ गुणतालिकेत आघाडीवर असेल तो ही स्पर्धा जिंकेल.
एक नजर दुलिप करंडक स्पर्धेतील गुण पद्धतीवर
दुलिप करंडक स्पर्धेत १० विकेट्स किंवा डावाने विजय मिळवणाऱ्या संघाला ७ गुण मिळतात. सामना जिंकणाऱ्या संघाला ६ गुण दिले जातात. जर सामना अनिर्णित राहिला तर या सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळवणाऱ्या संघाला ३ आणि दुसऱ्या संघाला १ गुण दिला जातो.