बंगळुरू : दक्षिण विभागाने आपला दबदबा कायम राखताना रविवारी पश्चिम विभागाला ७५ धावांनी पराभूत करत दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पश्चिम विभागाने २९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी दुसरा डाव पाच बाद १८२ धावांवरून पुढे सुरू केला. मात्र, त्यांना २२२ धावांपर्यंतच मजल मारता आली. दक्षिण विभागाकडून डावखुरा फिरकीपटू साई किशोर आणि वेगवान गोलंदाज वासुकी कौशिक यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. दक्षिण विभागाने १४ व्यांदा दुलिप करंडक जिंकला आहे. या विजयासह त्यांनी गतवर्षी पश्चिम विभागाकडून मिळालेल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला आहे.
गतवर्षी अंतिम लढतीत पश्चिम विभागाने दक्षिण विभागाला २९४ धावांनी पराभूत केले होते. रविवारी पश्चिम विभागाचा प्रियांक पांचाल ९२ धावांवरून पुढे खेळताना केवळ तीन धावा जोडून बाद झाला. त्याने वेगवान गोलंदाज विदवथ कावेरप्पा याच्या चेंडूवर यष्टिरक्षक रिकी भुई याच्याकडे झेल दिला. पांचाल बाद झाल्यामुळे पश्चिम विभागाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. कावेरप्पा सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. अतीत सेठ (९) आणि धर्मेंद्रसिंह जडेजा (१५) यांनी आठव्या गड्यासाठी २३ धावा जोडल्या. मात्र, ते केवळ पराभवाचे अंतर कमी करू शकले. धर्मेंद्र जडेजाने साई किशोरच्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात वाॅशिंग्टन सुंदरकडे झेल दिला. त्यानंतर सेठही बाद झाला. तळातील फलंदाजांनी पुरती निराशा केली. त्यामुळे पश्चिम विभागाला विजयी धावा करण्यात अपयश आले. दक्षिण विभागाकडून साई किशोर, वासुकी कौशिक यांच्याशिवाय विदवथ कावेरप्पा, विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दक्षिण विभागाने पहिल्या डावात २१३ धावा केल्या. पश्चिम विभागाला १४६ धावांवर रोखून पहिल्या डावात ६७ धावांची आघाडी घेतली होती.