बंगळुरु - डिसेंबर २०२२ मधील अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर पहिल्यांदाच कसोटी प्रारूपात पुनरागमन करत असलेला यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत मुख्य आकर्षण ठरेल. त्यामुळे पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
पंतने दुखापतीतून सावरल्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. पण तो आतापर्यंत दीर्घ प्रारूपामध्ये खेळलेला नाही. त्याने लाल चेंडूवरील अखेरचा सामना डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. आता तो अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वात ब संघाकडून मैदानावर उतरणार आहे. ब संघाचा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील अ संघाविरुद्ध होईल.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुुनरागमन करताना पंतला कोणतीही अडचण आली नाही पण चार दिवसीय स्पर्धेत त्याच्यासमोर यष्टिरक्षण आणि फलंदाजीच्या रूपाने दुहेरी आव्हान असेल. पंतला ब संघाचा तज्ज्ञ यष्टिरक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे भारताचे कसोटी क्रिकेटमधील आगामी व्यस्त वेळापत्रक पाहता भारतीय निवड समिती या यष्टिरक्षक फलंदाजाबाबत किती गंभीर आहे हे समजते.
यष्टिरक्षक निवडणे निवड समितीसाठी सोपे असणार नाही. कारण अ संघात ध्रुव जुरेलचा समावेश आहे. त्याने यावर्षी इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. ईशान किशनचाही यष्टिरक्षकाच्या जागेवर दावा असेल. तो ड संघाचा यष्टिरक्षक आहे. ड संघाचा सामना अनंतपूर येथे क संघाविरुद्ध होईल. क संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे.