नवी दिल्ली : आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधीच चेन्नई सुपरकिंग्सला धक्का बसला. संघाचा युवा अष्टपैलू सॅम कुरेन हा १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. कुरेन हा यूएईत उशिरा दाखल झाल्यामुळे सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. हा कालावधी २१ सप्टेंबरपर्यंत असेल. त्यामुळे तो पहिला सामना खेळू शकणार नाही. फाफ डुप्लेसिस हा देखील सीएसकेकडून पहिला सामना खेळू शकणार नाही. तो कॅरेबियन लीगमध्ये खेळताना जखमी झाला होता. त्याच्या जांघेच्या मांसपेशीदेखील ताणल्या गेल्या आहेत. यामुळे डुप्लेसिस मुंबईविरुद्ध खेळू शकेल, असे वाटत नाही.
सॅम हा भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत खेळला होता, मात्र ही मालिका बायोबबलचा भाग नव्हती. यामुळेच मालिकेत खेळलेल्या सर्वच खेळाडूंना आयपीएलआधी सहा दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. अनेक खेळाडू येथे आधीच दाखल झाल्याने त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे.
सॅम हा आयपीएल २०२० पासून सीएसकेसोबत आहे. मागच्या सत्रात धोनीचा संघ अपयशी ठरला. मात्र सॅमने स्वत:च्या कामगिरीच्या बळावर लक्ष वेधले होते. १४ सामन्यात त्याने १८६ धावा फटकविल्या, शिवाय १३ गडी बाद केले होते. त्याला काही वेळा आघाडीच्या फळीत फलंदाजीत संधी देण्यात आली. आयपीएल-१४ मध्ये कुरेनने ७ सामन्यात ५२ धावा केल्या. त्याला फलंदाजीची अधिक संधी मिळाली नव्हती.
अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमानचे खेळणे अनिश्चित
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान हा देखील आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सनरायजर्स हैदराबादकडून खेळेल का, याविषयी शंका व्यक्त होत आहे. मुजीबला अद्याप व्हिसा मिळालेला नाही. मुजीबच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. या संघातील सलामीचा फलंदाज जॉनी बेयरेस्टो याने दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली. मुजीबही बाहेर राहिल्यास संघासाठी मोठा धक्का असेल. २०२१ च्या सत्रात हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे.