Asia Cup 2023 : भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आशिया चषक खेळत आहे. टीम इंडियाने स्पर्धेतील आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला, जो पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पाकिस्तानविरूद्धचा सामना रद्द झाल्याने टीम इंडियाला एका गुणावर समाधान मानावे लागले. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण या मेगा इव्हेंटमध्ये समालोचन करत आहे. तिथे समाचलनासोबतच तो श्रीलंकेच्या सौंदर्याचा आनंद लुटताना दिसला, ज्याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
इरफान पठाणने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पठाण रिक्षात बसून श्रीलंकेत भटकंती करताना दिसत आहे. यादरम्यान डावखुरा अष्टपैलू खेळाडू श्रीलंकेच्या सुपरमार्केटमध्ये पोहोचला. तिथे त्याने काही पदार्थांचा आस्वाद देखील घेतला. व्हिडीओ शेअर करताना इरफान पठाणने कॅप्शनमध्ये लिहिले, "श्रीलंकेचे सौंदर्य पाहण्यासाठी ऑटोरिक्षामध्ये एक दिवस घालवला."
इरफान पठाण सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. भारत-पाकिस्तान सामन्यानंतरही त्याने एक पोस्ट केली होती, ज्यामुळे तो चर्चेत राहिला. खरं तर सामना रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर पठाणने ट्विट केले होते की, आज अनेक शेजाऱ्यांचे टीव्ही वाचले. या ट्विटनंतर पठाणला पाकिस्तानी चाहत्यांनी लक्ष्य केले.
दरम्यान, भारत-पाक सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला. पाकिस्तानी तीन गुणांसह संघाने सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे, तर भारतीय संघ आज स्पर्धेतील आपला दुसरा सामना नेपाळशी खेळत आहे. हा सामना जिंकून रोहित शर्मा अँड कंपनी सुपर-४ मध्ये प्रवेश करण्यासाठी मैदानात उतरली आहे.