आशिया चषक २०२३ पाकिस्तानच्या यजमानात खेळवली गेली. पण, बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे हायब्रिड मॉडेलनुसार ही स्पर्धा खेळवली गेली. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आर्थिक फटका बसल्याचा दावा त्यांच्याकडून केला गेला. पीसीबीने याआधी आशियाई क्रिकेट परिषदेकडे ( ACC) भरपाईची मागणी केली होतीच. त्यात त्यांनी आज विमानखर्चही मागितला आहे.
पीसीबीने आशिया चषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका प्रवासासाठी वापरलेल्या चार्टर्ड फ्लाईटच्या खर्चाची भरपाई मागितली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २ लाख ५० हजार डॉलर होस्टिंग फीसह तिकीट आणि प्रायोजकत्व शुल्का व्यतिरिक्त अतिरिक्त भरपाई मागितली आहे. त्यामुळे PCB आणि ACC मध्ये वाद उफाळून आला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यान पाकिस्तान ते श्रीलंका प्रवासासाठी चार्टर्ड फ्लाइट्सची सोय करण्यात आली होती. याच्या खर्चाचा हिशोब काढत पीसीबीने जय शहा अध्यक्ष असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे विमानखर्च मागितला. माहितीनुसार, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांमध्ये झालेल्या सामन्यांसाठी चार्टर्ड विमाने भाड्याने घेण्यासाठी पीसीबीला अतिरिक्त पैसे मोजावे लागले होते. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेने ही रक्कम देण्यास नकार दिला आहे.
खर्चावरून PCB आणि ACC आमनेसामने :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने देखील आक्रमक पवित्रा घेत अतिरिक्त खर्च देण्यास नकार दर्शवला आहे. कारण पाकिस्तानने आशिया चषकातील चार सामने मायदेशात आयोजित करण्या आले. त्याबदल्यात हायब्रीड मॉडेल अंतर्गत श्रीलंकेत सामने आयोजित करण्यास पाकिस्तानने सहमती दर्शवली होती. लक्षणीय बाब म्हणजे पीसीबीने पाकिस्तान आणि श्रीलंकादरम्यानच्या प्रवासासाठी क्लासिक ट्रॅव्हल नावाच्या श्रीलंकेतील कंपनीची सेवा घेतली होती. ज्यासाठी चार चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था करण्यासाठी २,८१,००० डॉलर्स एवढा खर्च आला.