बरेली-
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की चर्चा तर होणारच. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले हे दोन संघ आयसीसीच्या स्पर्धेत ज्या ज्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा रोमांचक सामन्याची अनुभूती क्रिकेट रसिकांना मिळत आली आहे. दोन्ही बाजूचे प्रेक्षक या सामन्याकडे नजरा लावून बसलेले असतात. संयम जैस्वालसारख्या क्रिकेट चाहत्यांसाठी यावेळीचा क्रिकेट सामना काहीसा खास ठरला आहे. बरेलीचा रहिवासी असलेला संयम जैस्वाल क्रिकेटच्या वेडापायी थेट संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचला. आशिया कप टी-20 सामना पाहण्यासाठी त्यानं बरेली ते यूएई असा प्रवास केला. पण तो स्टेडियमवर पोहोचणार तोवर खूप उशीर झाला होता.
भारतीय संघाची जर्सी त्याला विकत घ्यायची होती आणि तो सबंध स्टेडियमभर सर्व स्टॉलवर शोधू लागला. पण तो पोहोचेपर्यंत सर्व भारतीय जर्सी विकल्या गेल्या होत्या. त्याला पाकिस्तान संघाच्या जर्सीची विक्री सुरू असल्याचं एका ठिकाणी दिसलं. त्यानं ती लागलीच विकत घेतली आणि परिधान देखील केली. पण आता जर्सीचा हा वाद त्याच्या घरापर्यंत पोहोचला आहे. कारण पाकिस्तानची जर्सी परिधान केल्याचे परिणाम बरेतील त्याच्या कुटुंबीयांना भोगावे लागत आहेत.
कशामुळे झाला वाद?संयम जैस्वालने यूएईमधील सामना पाहिला आणि त्याचा एक फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केला. पण हिच गोष्ट त्याच्यासाठी अडचणीची ठरली. एका भारतीय चाहत्यानं पाकिस्तानी संघाला पाठिंबा दिल्याचं प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं. काहींनी संयमाला टॅग करुन प्रश्नांचा भडीमार करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी बरेलीतील अनेक लोकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि यूपीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी सुरू केली. सोशल मीडियावर वाढत चाललेला वाद पाहून कुटुंबीयांनी तत्काळ संयम जैस्वालला फोन केला. या संपूर्ण वादाबाबत आपली बाजू स्पष्ट करण्यास सांगितलं.
या संपूर्ण प्रकरणाबाबत संयम जैस्वालनं स्पष्ट केलं की, इतर लोकांप्रमाणे मी देखील भारतीय क्रिकेट संघाचा मोठा समर्थक आहे. मी माझ्या मित्रांसोबत स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्याचा प्लॅन केला. दुबईतील सामना पाहण्यासाठी मित्र अमेरिकेहून आला होता. स्टेडियमच्या बाहेरच्या दुकानात मी पाहिले की भारतीय संघाची जर्सी संपली आहे. यामुळे मला पाकिस्तानी संघाची जर्सी खरेदी करावी लागली. ती तिथे उपलब्ध होती.
पाकिस्तानी समर्थकांना डिवचण्याचा होता प्रयत्नभारतीय संघाची जर्सी मिळाली नाही इतकी मागणी होती. पण दुसऱ्याबाजूला पाकिस्तानी संघाची जर्सी सहज मिळत होती. यावरुन पाकिस्तानी प्रेक्षकांना डिवचण्यासाठी आपण पाकची जर्सी परिधान केली, असं संयम जैस्वाल यानं सांगितलं. "पाकिस्तानी संघाची जर्सी परिधान करुन मी स्टेडियममध्ये ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देत होतो. पण माझ्या या कृत्यामुळे अशी समस्या निर्माण होईल याची कल्पना मला नव्हती. केवळ पाकिस्तानला डिवचण्यासाठी जर्सी परिधान केली होती आणि पाकची जर्सी घातली असली तरी हातात माझ्या तिरंगाच होता, असंही त्यानं स्पष्ट केलं.
घडलेल्या घटनेनं संयमला धक्कासंयम जैस्वाल म्हणतो की, या संपूर्ण घटनेने मी दुखावलो आहे. मी माझ्या काही मित्रांसोबत फोटो शेअर केला आहे. हे सगळ्यांना कोणी व्हायरल करायला सुरुवात केली माहीत नाही. मी सध्या खूप तणावाखाली आहे. माझे वडील, पत्नी आणि मुलेही खूप अस्वस्थ आहेत. माझ्या संमतीशिवाय माझे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात असल्याने मला खूप दुःख झाले आहे. माझ्या फोटोजवरुन सगळे लोक वेगळ्याच कथा रचत आहेत.
संयम विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीहिमांशू पटेल नावाच्या व्यक्तीनं संयम जैस्वाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यांनी संयमचे फोटे देखील ट्विट केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात मी गौ रक्षक दलाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलत असून संयम विरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असं हिमांश पटेल यांनी सांगितलं आहे.
संयमचे वडील प्रचंड तणावातसंयम जैस्वालचे ७२ वर्षीय वडील या संपूर्ण घटनेमुळे प्रचंड तणावाखाली आहेत. "जे आपल्याला वर्षानुवर्षे ओळखतात ते आज आपल्या देशावर असलेल्या प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आम्हाला देशद्रोही म्हटले जात आहे. खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. मी हृदयविकाराचा रुग्ण आहे. या तणावाचा सामना करताना मला त्रास होत आहे", असं संयमचे वडील म्हणाले. या संपूर्ण प्रकरणावर बरेलीचे एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी सांगितले की, ही घटना दुबईमध्ये घडली आहे. हे आपल्या देशाबाहेर आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. ट्विटरवरील तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.