नवी दिल्ली : पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) आठव्या हंगामाला सोमवारी 13 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. नेहमीप्रमाणे PSL 2023 चा हंगाम मोठ्या धूमधडाक्यात सुरु झाला. लाहोर कलंदर आणि मुल्तान सुल्तान यांच्यातील सामन्यापूर्वी मैदानावर संगीत आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाके हा या उत्सवाचा केंद्रबिंदू होता. खरं तर सामना सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे स्टेडियमच्या छतावरून फक्त फटाके दिसत होते.
यादरम्यान अशी एक घटना घडली ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रकाश आणि धूर कमी झाल्यावर फटाक्यांच्या प्रदर्शनामुळे मैदानात काहीतरी गडबड झाल्याचे दिसून आले. अतिउत्साहात जास्त फटाके लावल्याने फ्लडलाइट टॉवरपैकी एक खराब झाला आणि त्याला आग लागली. जमिनीवरून एक छोटीशी आग स्पष्टपणे दिसत होती. पाकिस्तानातील वृत्तावाहिनी समा टीव्हीच्या रिपोर्टरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये फटाक्यांमुळे मोठी दुर्घटना कशी घडू शकते हे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर अग्निशमन दलाला फोन करून आग आटोक्यात आणण्यात आली. दुसरीकडे सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, लाहोर कलंदरच्या संघाने एका धावेने सलामीचा सामना जिंकून विजयी सलामी दिली.
शाहिन आफ्रिदीच्या संघाची विजयी सलामी
मुल्तान सुल्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेत्या लाहोर कलंदरच्या संघाने फखर जमानच्या 66 धावांच्या खेळीमुळे निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. उस्मान मीरने 4 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले. 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानने शानदार 75 धावांची खेळी केली. मुल्तान सुल्तानच्या संघाने पहिल्या बळीसाठी 100 धावांची भागीदारी करूनही मोहम्मद रिझवानचा संघ केवळ 174 धावाच करू शकला आणि सामना 1 धावाने गमावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: During Pakistan Super League 2023 ceremony, one of the floodlight tower was damaged and caught fire due to firecrackers, video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.