नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. ३ सामन्य़ांच्या मालिकेतील पहिला सामना काल पार पडला. ॲडिलेडच्या ओव्हल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली. या सामन्यातीलच एक व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चिमुकल्याने डेव्हिड वॉर्नरसोबत पोस्टरद्वारे खास संवाद साधला. हा छोटा चाहता डेव्हिड वॉर्नरला पोस्टरद्वारे प्रश्न विचारतो, ज्याला वॉर्नर थेट सामन्यादरम्यानच उत्तर देतो.
या छोट्या चाहत्याच्या हातात एक पोस्टर असते, ज्यामध्ये लिहले की, "डेव्हिड मला तुझा शर्ट मिळू शकले का?" यादरम्यान कॅमेरा डगआउटमध्ये बसलेल्या डेव्हिड वॉर्नरकडे वळला. मुलाचा संदेश पाहून डेव्हिड वॉर्नरलाही हसू आवरले नाही. त्याचवेळी त्याचा सहकारी खेळाडू गंमतीने डेव्हिड वॉर्नरचा शर्ट काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने सहकारी खेळाडूला हातवारे करून सांगितले की, मी आत काहीही घातलेले नाही. यानंतर, वॉर्नर हातात कागदाचा तुकडा घेऊन कॅमेराकडे दाखवतो, ज्यावर लिहिले असते की, "मार्नस लॅबुशानेकडून एक घ्या". वॉर्नरचा मेसेज वाचून मुलाने आणखी एक कागद दाखवला त्यावर लिहिले होते, "मार्नस प्लीज मी तुझा शर्ट घेऊ शकतो का?" त्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या मार्नस लबुशाने आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात एकच हशा पिकला.
ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी यजमान कांगारूच्या संघाने मालिकेतील पहिलाच सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लिश संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून २८७ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक १३४ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पा आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ३-३ बळी पटकावले. इंग्लंडने दिलेल्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने ४६.५ षटकांत ६ गडी राखून पूर्ण केला आणि विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरने ८६ धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने ८० धावांची नाबाद खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"