आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन जबरदस्त सामने झाले. दोन्ही संघ पहिल्यांदा ग्रुप स्टेजमध्ये आमनेसामने आले, जेथे हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळामुळे भारताने पाच विकेट्सने विजय मिळवला. दुसरीकडे, सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला.
आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, त्याच्या लहान मुलीने 4 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारताचा झेंडा फडकावला होता. आफ्रिदीनं पाकिस्तानातील समा टीव्हीशी संवाद साधला. आफ्रिदीने साम टीव्हीला सांगितले की, त्याचे कुटुंबीय सामना पाहण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गेले होते. दरम्यान, सामना पाहण्यासाठी आलेले 90 टक्के चाहते हे भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आले होते, असं पत्नीनं सांगितल्याचा दावा आफ्रिदीने केला.
“ज्या ठिकाणी माझे कुटुंबीय बसले होते त्या ठिकाणी भारतीय संघाचे चाहते अधिक होते. मला व्हिडीओही पाठवण्यात येत होते, जे मी पाहातही होतो. या ठिकाणी केवळ 10 टक्के पाकिस्तानी आहेत, 90 टक्के असं माझी पत्नी सांगत होती. इतकंच काय तर तिकडे पाकिस्तानचा झेंडाही मिळत नव्हता. तर माझ्या छोट्या मुलीने भारताचा झेंडा हाती घेऊन फडकावला. माझ्याकडे व्हिडीओ आले होते. मी विचार करत होतो ते ट्वीट करू की नको. अखेर मी विचार सोडून दिला,” असं त्यानं सांगितलं.
वादग्रस्त विधानपाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. परंतु त्याचा नवा दावा आश्चर्यचकित करणारा आहे. यापूर्वी त्यानं भारत पाकिस्ताचा शत्रू राष्ट्र असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यानं यासीन मलिकचा सपोर्ट करणारं एक ट्वीटही केलं होतं.