भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपाखासदार त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. गंभीर क्रिकेट विश्वातील चालू घडामोडींवर भाष्य करत असतो. सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून, गंभीर समालोचकाच्या भूमिकेत आहे. यावेळी 'क्रिकेट लाईव्ह'मध्ये बोलताना त्याने एक मोठा खुलासा केला आहे. न्यूझीलंडमधील नेपियर कसोटी सामन्यात मोठी खेळी करण्यामागे हनुमान चालीसा असल्याचे त्याने सांगितले.
नेपियर कसोटी सामन्यात गंभीर अडीच दिवस खेळपट्टीवर टिकून होता आणि त्याने १३६ धावा कुटल्या होत्या. गंभीरची ही ऐतिहासिक खेळी आजतागायत सर्वांच्या लक्षात आहे. गंभीरने आठवणींना उजाळा देताना म्हटले, "नेपियर कसोटी सामन्यात मी लंच आणि टी सेशनदरम्यान माझ्या रूममध्ये हनुमान चालीसा ऐकली अन् मला अडीच दिवस फलंदाजी करणं शक्य झालं. ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती आहे."
दरम्यान, गौतम गंभीर त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो चाहत्यांच्या दिशेने अश्लील इशारे करत असल्याचे दिसते. क्रिकेटमधून निवृत्त झालेला गंभीर राजकीय मैदानात सक्रिय आहे. तो भाजपाचाखासदार असून आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक देखील आहे.
भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषक खेळत आहे. रोहितसेनेने आपला विजयरथ कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मंगळवारी सुपर ४ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या सामन्यात समालोचन करताना गंभीरने भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले. त्याने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या कार्यक्रमात म्हटले, "रोहित शर्मा आज महेंद्रसिंग धोनीमुळे रोहित शर्मा बनला आहे. धोनीने त्याला सुरूवातीच्या काळात खूप पाठिंबा दिला, सहकार्य केले, जेव्हा तो स्ट्रगल करत होता."