पाकिस्तान सुपर लीग ही शेजारील देशात खूप लोकप्रिय आहे. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या या लीगचा सध्या नववा हंगाम खेळवला जात आहे. या लीगमध्ये पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू सहभागी होत असतात. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरही या लीगचा एक भाग आहे. आमिर पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग २०२४ मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत आहे. पाकिस्तान सुपर लीगचा यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेतील २८ वा सामना क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळवला गेला. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोरला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पण, या सामन्यादरम्यान घडलेली एक घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
खरं तर झाले असे की, पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमिरला एका चाहत्याने डिवचले. त्याच्यासमोर आक्षेर्पाह शब्द वापरल्यामुळे आमिर भडकला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील सामन्याचा आहे. या व्हिडीओमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचे खेळाडू बहुधा ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतत आहेत. चाहते आणि खेळाडू यांच्यात फक्त लोखंडी जाळीचे अंतर होते. चाहते आपापल्या खेळाडूंसाठी भरभरून दाद देत असल्याचे दिसत आहे. मात्र मोहम्मद आमिर तिथून जाताच एका चाहत्याने फिक्सर-फिक्सरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
हे ऐकून आमिरचा पारा चढला. तो परत आला आणि चाहत्याला त्याने सुनावले. एवढेच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटपटूने अपशब्दही वापरले. "घरी हेच शिकवले जाते का?", असेही तो म्हणाला. २०१० मध्ये मोहम्मद आमिर स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी झाला होता, त्यानंतर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती.
३१ वर्षीय मोहम्मद आमिरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी एकूण ३६ कसोटी, ६१ वन डे आणि ५० ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत ११९, वन डेमध्ये ८१ आणि ट्वेंटी-२० मध्ये ५९ बळींची नोंद आहे. आमिरने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.