Women’s Premier League । मुंबई : 4 मार्चपासून मुंबईत महिला प्रीमियर लीगचा थरार रंगला आहे. डिवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या (WPL) उद्घाटन सामन्यात संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चमकदार कामगिरी केली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. यामध्ये मुंबईच्या संघाने दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला.
दरम्यान, या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात (दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) एका चाहत्याच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले. या चाहत्याने पोस्टरच्या माध्यमातून कॅमेरामॅनकडे एक भन्नाट मागणी केली आहे. "डिअर, कॅमेरामॅन iplमध्ये मुलींना दाखवता आता wplमध्ये आम्हाला 'द बॉइस'ला दाखवा...", चाहत्याचा हा पोस्टर आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
खरं तर यंदापासून आयपीएलच्या धरतीवर महिला प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी एकूण 5 संघ रिंगणात आहेत. ज्या दिवशी दोन सामने असतील त्यातील पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. संध्याकाळी सर्व सामने 7.30 वाजता सुरू होतील. तसेच मुंबईतील डिवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर प्रत्येकी 11-11 सामने होणार आहेत. विशेष बाब म्हणजे 21 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियम यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लीग टप्प्यातील अंतिम सामना खेळवला जाईल. तर 24 मार्च रोजी डिवाय पाटील स्टेडियमवर एलिमिनेटरचा सामना होणार आहे. महिला प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.
महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक -
- 4 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात
- एकूण 22 सामने
- 4 दुहेरी लढती
- डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने.
- ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने.
- 26 मार्चला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"