नवी दिल्ली : एखाद्या खेळाडूची कारकिर्द कधी संपुष्टात येईल, हे सांगता येत नाही. जेव्हा खेळाडू दमदार कामगिरी करत असतो, तेव्हा तो अनेकांच्या गळ्यातील ताईत असतो. पण एकदा का त्याची कामगिरी खालवायला लागली की त्याचे लचके तोडायलाही काही लोकं कमी करत नाहीत. अशीच एक गोष्ट त्या क्रिकेटपटूबद्दलही घडली. कारकिर्दीत एक वादळ आलं, त्यामध्ये तो अतिमद्यपान करायला लागला आणि त्याची कारकिर्द उध्वस्त झाली.
एका प्रकरणात तो एवढे जास्त मद्यपान करायला लागला की त्याने काही वेळा संघाची शिस्त मोडली. या गोष्टीसाठी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली. त्यानंतरही तो सुधारत नसल्याने क्रिकेट मंडळाने त्याच्याबरोबरचा करार रद्द केला आणि त्याची कारकिर्द संपुष्टात आली. ही गोष्ट आहे ती ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूची. अँड्रयू सायमंड्स हे त्या खेळाडूचं नाव.
"भारताबरोबरच्या दौऱ्यात २००८ साली 'मंकीगेट' हे प्रकरण झाले. या प्रकरणात भारताच्याहरभजन सिंगने माझ्यावर वर्णद्वेषी टिपण्णी केली होती. त्याचबरोबर त्याने मला माकडही म्हटले होते. या गोष्टीची मी तक्रार केली. ही तक्रार गंभीरपणे घेण्यात आल्यानंतर भारताने हा दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णयही घेतला होता. पण त्यानंतर हरभजन दोषी नसल्याचे सिद्ध झाले," असे सायमंड्स सांगत होता.
सायमंड्स पुढे म्हणाला की, " या प्रकरणात हरभजन दोषी असूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही, उलटपक्षी माझ्यावर टीका व्हायला लागली. त्यामुळे मी मद्यपान करायला लागलो. त्याचे प्रमाण वाढत गेले आणि अखेर माझी कारकिर्द संपुष्टात आली. एक प्रकरण कसे कारकिर्द संपवू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे."