नवी दिल्ली : वनडे विश्वचषकात सलग पाच विजय नोंदविणाऱ्या टीम इंडियाचे आधारस्तंभ कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल आणि जसप्रीत बुमराह हे रविवारी न्यूझीलंडविरुद्ध विजय साजरा केल्यानंतर संघापासून वेगळे झाले. मंगळवारी विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यासाठी खेळाडू घरी परतले आहेत.
भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध लखनौमध्ये २९ ऑक्टोबर रोजी होईल. सामन्याला सात दिवस शिल्लक असल्याने हे चौघे कुटुंबासोबत दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी घरी परतले. त्यांच्या विश्रांतीचा संघाला लाभ होईल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला. सर्व खेळाडू २६ ऑक्टोबर रोजी लखनौ येथे सरावासाठी एकत्र येतील. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी छोटासा ब्रेक घेतला. या ब्रेकचा विश्वचषकातील आगामी सामन्यासाठी लाभ होणार आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घोट्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. बांगलादेशविरुद्ध पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध तो खेळू शकला नव्हता.
३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान आशिया चषकाचे आयोजन झाले. तेव्हापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह बहुतेक खेळाडू घरापासून दूर आहेत. सतत प्रवास करीत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, ‘पुढील सामन्याला सात दिवसांचा अवधी असल्याने खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत थोडा वेळ मिळणे योग्य आहे. त्यासाठी त्यांनी विश्रांती घेतली आहे.’