IPL 2021, CSK: आयपीएलच्या धुमधडाक्याला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होतेय. यंदाचं आयपीएलचं पर्व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं स्थगित करण्यात आलं होतं. आता उर्वरित ३१ सामने आजपासून यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यामुळं आयपीएलला यंदाच्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. यासाठी संघ देखील सज्ज झाले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होतेय. मुंबई इंडियन्स संघानं आयपीएलचं पाचवेळा जेतेपद प्राप्त केलं आहे. तर धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघानं तीनवेळा जेतेपद पटकावलं आहे. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा असल्यानं या दोन संघांमधील लढत दरवेळी चुरशीची होते. पण दोन्ही संघांमध्ये एक असा खेळाडू राहिला की ज्यानं गेल्या १५ वर्षांमध्ये दरवर्षी टी-२० स्पर्धेत एखाद्या स्पर्धेचे जेतेपद पटकावलं आहे.
मुंबई विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनीचा जलवा, ८ षटकार ठोकत दिला इशारा; पाहा VIDEO
नुकतंच या खेळाडूनं कॅरेबियन प्रीमियर लीगचंही जेतेपद आपल्या नावावर केलं आहे. तेही संघाचं नेतृत्त्व करत त्यानं हे जेतेपद जिंकलं. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो याच्या नेतृत्त्वात सेंट किट्स अँड नेविस पेट्रियट्स संघानं सीपीएल २०२१ स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला आहे. ब्रावोच्या संघानं अंतिम सामन्यात सेंट लुसिया किंग्ज संघाला पराभूत केलं आहे. ड्वेन ब्रावोनं आपल्या टी-२० करिअरमध्ये १५ वं जेतेपद जिंकलं आहे.
बर्थडे साजरा करणाऱ्या क्रिकेटरची भविष्यवाणी; MI आणि CSK मध्ये कुठली टीम बाजी मारणार?
ड्वेन ब्रावो सीपीएलमध्ये गेल्या सीजनला कायरन पोलार्डच्या नेतृत्त्वाखालील ट्रिनबॅगो नाइटरायडर्स संघातून खेळला होता. त्यावेळीही संघानं स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ब्रावो सेंट किट्स अँड नेविस पेट्रियट्स संघाचा शिलेदार झाला. २०२० साली सेंट किट्स अँड नेविस संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर राहिला होता. त्यावेळी संघानं १० सामन्यांमध्ये केवळ एकच सामना जिंकला होता. पण यावेळी ड्वेन ब्रावोच्या नेतृत्त्वात संघानं इतिहास घडवला आहे. यात संघानं साखळी फेरीत १० पैकी ६ सामने जिंकले आणि १२ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत संघानं गतविजेत्या नाइटरायडर्स संघाचा पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. फायनलमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा तीन विकेट्सनं धुव्वा उडवत ब्रावोच्या संघानं विजय प्राप्त केला. ब्रावोनं या स्पर्धेत १० सामन्यांत ८ विकेट्स मिळवल्या, तर १४५ धावांचं मोलाचं योगदान दिलं.
तीन सीझनमध्ये मुंबईसाठी खेळला ब्रावो
ब्रावोनं आता विजेतेपदांच्या बाबतीत पोलार्डची बरोबरी केली आहे. पोलार्डनंही टी-२० स्पर्धेत १५ वेळा जेतेपद प्राप्त केलं आहे. आता आयपीएल २०२१ च्या माध्यमातून दोन्ही खेळाडूंना १६ वं जेतेपद जिंकण्याची आणि नवा विक्रम नावावर करण्याची संधी असणार आहे. ब्रावोनं आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काळात मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तो मुंबईकडून तीन सीझन खेळला आहे. त्यानंतर २०११ साली ब्रावो चेन्नई सुपरकिंग्जच्या ताफ्यात दाखल झाला. त्यानंतर आतापर्यंत ब्रावो चेन्नईकडूनच खेळत आहे. आयपीएलमध्ये ब्रावोच्या नावावर १४४ सामन्यांमध्ये १५१० धावा आणि १५६ विकेट्स नावावर आहेत. यंदाचं आयपीएल ब्रावोसाठी शेवटचं आयपीएल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा चेन्नईला जेतेपद मिळवून देत शेवट गोड करण्याचा ब्रावोचा इरादा असणार आहे.
Web Title: Dwayne Bravo chennai Super kings champion all rounder IPL 2021 mumbai indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.