Dwayne Bravo : कायरन पोलार्डने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६०० ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या पहिल्या क्रिकेटपटूचा मान पटकावल्यानंतर आज त्याचा सहकारी ड्वेन ब्राव्हो याने ट्वेंटी-२०त भीमपराक्रम केला. वेस्ट इंडिजचा माजी व चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स घेणाऱ्या पहिल्या गोलंदाजाचा मान पटकावला. ३८ वर्षीय ब्राव्हो सध्या दी हंड्रेड ( The Hundred) लीगमध्ये खेळतोय आणि त्याने नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना हा पराक्रम केला. ब्राव्होने ५४५ ट्वेंटी-२० सामन्यांत ६०० विकेट्स घेतल्या आहेत.
ओव्हल इन्व्हिजिबल्सच्या रिली रोसोवूची विकेट घेत ब्राव्होने हा पराक्रम केला. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा राशिद खान आहे. त्याने ३३९ सामन्यांत ४६६ विकेट्स घेतल्या आहेत. १६ फेब्रुवारी २००६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या ब्राव्होने आतापर्यंत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५ हून अधिक संघ/क्लब्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने विंडीजकडून ९१ सामन्यांत ७८ विकेट्स घेतल्या आहेत, तर उर्वरित ५२२ विकेट्स या त्याने विविध लीग व स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना घेतल्या आहेत.
ब्राव्होने विंडीजकडून २०१२ व २०१६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. मागील वर्षी पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विंडीजला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा तो स्टार आहे. आयपीएलमध्ये १६१ सामन्यांत त्याने १८३ विकेट्स गेतल्या आहेत आणि दोन वेळा पर्पल कॅप जिंकली आहे. आयपीएल २०२२मध्ये त्याने लसिथ मलिंगा याचा आयपीएलमधील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा विक्रम मोडला.
Web Title: Dwayne Bravo has completed 600 wickets in T20 Cricket - He becomes first bowler to achieve this milestone.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.