नवी दिल्ली : सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगला आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आपल्या अप्रतिम फलंदाजीने क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले. १७ जुलैला स्पर्धेतील पाचवा सामना खेळवला गेला. यामध्ये ब्राव्होने एक गगनचुंबी षटकार ठोकून 'टायगर जिंदा है' हे दाखवून दिले. आपल्या अष्टपैलू खेळीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा किल्ला लढवणारा ब्राव्हो अमेरिकेत देखील आपली जबाबदारी पार पाडत आहे. पण, ब्राव्होला त्याच्या टेक्सास सुपर किंग्जच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.
ब्राव्होने तब्बल १०६ मीटर लांब षटकार ठोकून आपल्या चाहत्यांना जागे केले. दरम्यान, मेजर लीग क्रिकेट स्पर्धेचा पाचवा सामना वॉशिंग्टन फ्रीडम आणि टेक्सास सुपर किंग्ज यांच्यात खेळवला गेला. सलामीवीर मॅथ्यू शॉर्टच्या (८०) शानदार खेळीच्या जोरावर वॉशिंग्टन फ्रीडम संघाने हा सामना सहा धावांनी आपल्या नावे केला.
एनरिक नॉर्खियाच्या गोलंदाजीवर १०६ मीटर षटकारब्राव्होने ३९ चेंडूत ७६ धावांची अप्रतिम खेळी केली. ५ चौकार आणि ६ षटकार मारून कॅरेबियन खेळाडूने सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला पण त्याची एकतर्फी झुंज अयशस्वी ठरली. त्याने टेक्सास सुपर किंग्जच्या डावाच्या अठराव्या षटकात एनरिक नोर्खियाविरुद्ध गगनचुंबी षटकार ठोकला. ज्या वेगाने गोलंदाजाने चेंडू टाकला त्याच वेगाने ब्राव्होने त्याला सीमारेषेबाहेर पोहचवले.
ब्राव्होच्या संघाचा ६ धावांनी पराभव तत्पुर्वी, वॉशिंग्टन फ्रीडमचा कर्णधार मोइसेस हेन्रिक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉशिंग्टनच्या संघाने निर्धारित २० षटकांत १६३ धावा केल्या. १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टेक्सास सुपर किंग्जचा संघ २० षटकांत केवळ १५७ धावाच करू शकला आणि सामना ६ धावांनी गमवावा लागला.