विशाखापट्टणम : फॉर्मात असलेल्या आघाडीच्या फलंदाजांच्या जोरावर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी होणाऱ्या दुस-या एकदिवसीय लढतीत विजयाची लय कायम राखण्यास उत्सुक आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने जर ८१ धावा फटकावल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला पिछाडीवर सोडत सर्वांत वेगवान १० हजार धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज ठरेल. या विक्रमाच्या शक्यतेमुळे प्रेक्षकांमध्ये या लढतीबाबत अतिरिक्त उत्साह संचारला आहे. तेंडुलकरने २५९ डावांमध्ये हा आकडा गाठला होता तर कोहलीने आतापर्यंत २०४ डावांत फलंदाजी केलेली आहे.
विराट व रोहित यांच्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर गुवाहाटीमध्ये गेल्या लढतीत ३२३ धावांचे लक्ष्य सहज गाठताना भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. गुवाहाटीमध्ये विराट व रोहित यांनी भारताला ४७ चेंडू शिल्लक राखून विजय मिळवून देताना विंडीजचे उरलेल्या मनोधैर्याचेही खच्चीकरण केले. आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या फॉर्ममुळे मधल्या फळीतील फलंदाजांना अधिक काही करण्याची गरजच भासली नाही.
विश्वचषक स्पर्धेपूर्वी महत्त्वाची मानली जात असलेल्या या मालिकेत मधल्या फळीची चाचणी घेण्याची गरज आहे. भारताला वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए व्हीजीसीए स्टेडियममध्ये गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. गेल्या लढतीत गोलंदाजी कमकुवत ठरल्याची कोहलीला चांगली
कल्पना आहे.
डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह व विश्वासपात्र भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजांना बारसापारा स्टेडियममध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जडेजाला सूर गवसला नाही. त्यामुळे कॅरेबियन फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. मोहम्मद शमीने १० षटकांत ८१ धावा बहाल केल्या असल्या तरी पर्याय नसल्यामुळे कोहलीला त्यालाच खेळवावे लागेल.
दुसºया कसोटी सामन्यात १० बळी घेणाºया उमेश यादवलाही त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. विश्वचषक स्पर्धेत आता वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे संघव्यवस्थापन वेगवान गोलंदाजांचा पूल तयार करण्यास प्रयत्नशील आहे. त्यामुळे उमेशला अधिक संधी दिली जाऊ शकते. पहिल्या लढतीत संघाबाहेर असलेला चायनामन कुलदीप यादवला खलील अहमदच्या स्थानी संधी मिळू शकते.
विंडीजला शिमरोन हेयमेयरकडून पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याने ७८ चेंडूत १०६ धावा केल्या होत्या. अनुभवी मर्लोन सॅम्युअल्स पहिल्या सामन्यात लवकर बाद झाला होता. कॅरेबियन संघात वेगवान गोलंदाज केमार रोचचे पुनरागमन झाले आहे. यामुळे या सामन्यात विंडीज गोलंदाजीची धार निश्चित वाढेल, असा विश्वास कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
>होल्डरला गोलंदाजांकडून आशा
गोलंदाजांकडून शिस्तबद्ध कामगिरीची आशा असून सुरुवातीला विकेट घेणे महत्त्वाचे आहे, असे मत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केले. होल्डर म्हणाला, ‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नव्या चेंडूंचा लाभ घेणे आवश्यक असते. प्रत्येक संघ त्यासाठी प्रयत्नशील असतो. आम्हाला नव्या चेंडूने अधिक बळी घ्यावे लागतील. आम्ही गेल्या सामन्यात केवळ एक बळी घेतला. नव्या चेंडूने जर आणखी दोन-तीन बळी घेतले तर भारताच्या मधल्या फळीवर दडपण आणू शकतो. ३२० धावा फटकावणे चांगली बाब होती, पण आम्हाला भारतातील परिस्थितीची कल्पना आहे. येथे ३२०, ३४०, ३५० धावांच्या लक्ष्याचाही बचाव करताना चांगला मारा करावा लागतो. आम्ही फलंदाजीमध्ये सातत्य राखण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.’
>मधल्या फळीत खेळण्याचे दडपण नाही : रायुडू
‘माझ्यासाठी ही जबाबदारी म्हणजे नवी बाब नाही. त्यामुळे माझ्यावर कुठलेही दडपण नाही,’ असे अंबाती रायुडूने म्हटले. तो पुढे म्हणाला, ‘मी प्रदीर्घ कालावधीपासून मधल्या फळीत फलंदाजी करीत आहे. त्यांनी मला काही नवे करायला सांगितलेले नाही.’ हैदराबादचा हा ३३ वर्षीय फलंदाज म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी सध्या केवळ या मालिकेवर लक्ष देत असून फार दूरचा विचार करीत नाही.’
>लाराकडून प्रेरणा घेतली - हेटमायर
खराब फॉर्मातून सावरण्यासाठी ब्रायन लाराची मदत घेतली, असे विंडीजचा आक्रमक फलंदाज शिमरोन हेटमायरने म्हटले. युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करणाºया या महान फलंदाजाचा मी आभारी आहे. लारा माझा आदर्श असून मी त्याचे बरेच फटके आत्मसात केले,’ असेही हेटमायरने सांगितले.
>वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), फेबियन एलेन, सुनील अंबरीश, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिमरोन हेटमेयर, शाई होप, अलजारी जोसेफ, एविन लुईस, एशले नर्स, किमो पॉल, रोवमॅन पॉवेल, केमार रोच, मर्लोन सॅम्युअल्स आणि ओशाने थॉमस.
>भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, उमेश यादव आणि लोकेश राहुल.
Web Title: The eagerness of Kohli to record the World Cup, the West Indies will try to come back
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.