Earthquake ICC U-19 World Cup स्पर्धेत झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात सामना सुरू असताना चक्क भूकंपाचे धक्के जाणवले. पोर्ट ऑफ स्पेनच्या किनाऱ्यावरील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले. मात्र या धक्क्यांचा खेळावर परिणाम झाला नाही. झिम्बाब्वेच्या डावाच्या सहाव्या षटकात भूकंप आला. आयर्लंडचा फिरकीपटू मॅथ्यू हम्फ्रीज त्या षटकातील पाचवा चेंडू टाकत असताना सामना प्रसारित करणारा कॅमेरा जोमाने हलू लागला. त्यानंतर हा भूकंपाचा धक्का असल्याचं निष्पन्न झालं.
कॅमेरा हलू लागल्यानंतरही खेळ थांबला नाही. फलंदाज ब्रायन बेनेटने मिड ऑफच्या दिशेने बचावात्मक शॉट खेळत सामना सुरू ठेवला. पण समालोचन कक्षातील कॉमेंटेटर अँड्र्यू लिओनार्ड यांना भूकंपाचा धक्का जाणवला. 'मला पृथ्वी थरथरल्यासारखी वाटतेय. खरोखरच हा भूकंप आहे. ट्रेनमधून जाताना जशी थरथर जाणवते तसं दिसतंय. क्वीन्स पार्क ओव्हलचं सगळं मीडिया सेंटर हादरतंय", असं कॉमेंटेटर म्हणाला. परंतु, भूकंपाचे धक्के जाणवत असतानाही सामन्याच्या प्रसारणात कोणताही अडथळा आला नाही.
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, झिम्बाब्वे आणि आयर्लंड आपापल्या गटात तिसरे स्थान मिळवून सुपर लीगच्या टप्प्यातून बाहेर पडले. आता दोन्ही संघ ९ ते १२ व्या स्थानासाठी होणाऱ्या लढतींमध्ये खेळत आहेत. ३१ जानेवारीला पोर्ट ऑफ स्पेनमध्ये प्लेट लीगचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे चार संघ सुपर लीगच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ भिडतील, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया संघ भिडतील. सुपर लीगचा अंतिम सामना ५ फेब्रुवारीला अँटिग्वा येथे होणार आहे.