भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी झी न्यूज या वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये खळबळजनक गौप्यस्फोट केल्याने बीसीसीआयमध्ये भूकंप झाला आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेटपटूंचा फिटनेस, रोहित शर्मा, विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत स्फोटक दावे केल्याने बीसीसीआयची पुरती नाचक्की झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी संघ जाहीर होणार आहे.
चेतन शर्मा यांना गेल्या महिन्यातच पुन्हा एकदा निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. दरम्यान, झी न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय खेळाडू फिट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात. कुठली इंजेक्शन डोप टेस्टमध्ये पकडता येत नाहीत, हे खेळाडूंना माहिती आहे, असे चेतन शर्मा सांगताना दिसत आहेत. दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहलीमध्ये झालेल्या वादात अहंकार मुख्य कारण होते. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संघाबाहेर करण्यासाठी आरामाचं नाटक रचलं जात आहे, असा दावा केला होता.
आता या संपूर्ण प्रकरणाची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय संघाच्या निवड समितीचे सदस्य आणि प्रमुख हे बीसीसीआयशी करारबद्ध असतात. त्यांना जाहीरपणे संघाशी संबंधित गोष्टी बोलण्याची परवानगी नसते. या प्रकरणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, चेतन शर्मांचं भवितव्य काय असेल हे आता बीसीसीआयचे सचिव जय शाह ठरवतील. या गौप्यस्फोटांनंतर टी-२० कर्णधार हार्दिक पांड्या आणि वनडे व कसोटी कर्णधार रोहित शर्मा हे चेतन शर्मांसोबत संघनिवड करण्यासाठी बसतील का? हाच प्रश्न आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण केवळ बीसीसीआयसाठीच नाही तर संपूर्ण भारतीय क्रिकेकसाठी लाजीरवाणे आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आलेला आहे. याचे दुरगामी परिणाम होती. आता बोर्डाला क्रिकेटपटूंना शांत करावे लागेल, तसेच त्यांच्या प्रतिक्रियांचाही सामना करावा लागेल. मात्र चेतन शर्मा यांचे बीसीसीआयमध्ये आता मोजकेच दिवस उरले आहेत. कारण या प्रकरणानंतर खेळाडू त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.