किशोर बागडे, स्टींग विश्लेषण
नागपूर : टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांचा स्टिंग व्हिडीओ समोर आल्याने भारतीय क्रिकेट संघ आणि बोर्ड हादरले आहेत. या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. यामागील नेमका अर्थ काय? हे आताच का घडले? यासारखे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना त्रस्त करीत आहेत.
विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. जसप्रीत बुमराहची दुखापत, हार्दिक पांड्याचे करिअर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी केलेली वक्तव्ये ऐकून भारतीय क्रिकेटरसिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हे स्टिंग डिसेंबर महिन्यात झाले, असे म्हटले जात आहे. यावेळी चेतन निवड समिती प्रमुख नव्हते. पहिल्या टर्मनंतर त्यांची उचलबांगडी झाली होती. नंतर ९ जानेवारीला त्यांची या पदावर फेरनिवड झाली. मधल्या काळात त्यांनी बोर्ड आणि खेळाडूंबाबत इतक्या आतल्या गोष्टी का बरळल्या असाव्यात? बीसीसीआयने यावर अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी मोठी कारवाई नक्की होईल, असे संकेत मिळत आहेत.
चेतन यांची धक्कादायक वक्तव्ये...
खेळाडू ८० ते ८५ टक्के फिट झाल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी इंजेक्शन घेतात. जसप्रीत बुमराहचे सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करण्यावरून संघ व्यवस्थापनाशी मतभेद होते. बुमराहला अजूनही संघात संधी मिळालेली नाही. विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात भांडण झाले होते. गांगुलीमुळे विराटला कर्णधारपद गमवावे लागले. इशान किशन याच्या द्विशतकी खेळीमुळे संजू सॅमसन सारख्यांना संघात स्थान नाही. संघातून स्थान गमावण्याच्या भीतीपोटी इंजेक्शनचा वापर करीत खेळाडू स्वत:ला फिट ठेवतात.
बीसीसीआय काय कारवाई करणार?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर होणार असताना हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे. अशा परिस्थितीत संघ निवडीपूर्वी बीसीसीआय याप्रकरणी काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल. विशेष म्हणजे, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर चेतन शर्मांच्या भविष्याबाबत काय होणार? त्यांना वर्षाला सव्वाकोटी दिले जातात. बोर्डाची इभ्रत चव्हाट्यावर आणल्यानंतरही ते पदावर कायम राहिले, तर रोहित शर्माचा सामना कसा करणार? यावर रोहित शर्मा काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे बाकी आहे. आज नाही तर उद्या रोहित कर्णधार असल्याने पत्रकार परिषदेला नक्की येईल. त्यावेळी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती होईल. आज बीसीसीआय, भारतीय संघ, कर्णधार व चेतन यांची प्रतिमा डागाळली आहे.
दिग्गजांचे मौन...चेतन यांच्या खुलाशांवर क्रिकेटमधील दिग्गज मौन पाळून आहेत. माध्यम प्रतिनिधींना कुणीही प्रतिक्रिया द्यायला धजावत नाही. यामागील त्यांची व्यावसायिक भूमिका समजण्यासारखी आहे; पण यामुळे हा संभ्रम आणखी गडद होत आहे. याआधीही अशा गोष्टी माध्यमांतून समोर आल्या होत्या. मात्र, जबाबदार पदावर असलेल्या शर्मांच्या तोंडून अशा गोष्टी बाहेर आल्याने मोठा वाद निर्माण होऊ शकतो, कारण ही गोपनीय बाब आहे.