भारतीय संघानं घरच्या मैदानावर झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर ३-१ असा विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. १८ जूनला लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) असा अंतिम सामना रंगणार आहे. पण, आता या सामन्यावर कोरोनाचं सावट आल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्ण संख्याही झपाट्यानं वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अशात UK सरकारनं भारताला 'Red List' मध्ये टाकले आहे आणि त्यामुळे आता टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला मुकावे लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,619 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,50,61,919 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,78,769 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यूनायटेड किंग्डममध्ये ( UK) शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून भारतातून येणाऱ्या सर्व व्यक्तींवर प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. ब्रिटीश किंवा आयरिश किंवा जे सध्या UKत राहत आहेत त्यांना दहा दिवसांचं सक्तिचं क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. क्रीडापटूंनाही त्यात सूट दिलेली नाही. पण, तरीही जून महिन्यात आयोजित केलेली फायनल होईल, असा विश्वास इंग्लंड क्रिकेड बोर्डानं व्यक्त केला आहे.
भारतीय संघ जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणार आहे आणि त्यानंतर यजमान इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिकाही नियोजित आहे. पाकिस्तानलाही रेड लिस्टमध्ये टाकले गेले आहे आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघही पुढील महिन्यात वन डे व ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. शिवाय भारताचा महिला क्रिकेट संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या सर्व मालिकांसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला सरकारकडून खेळाडूंसाठीच्या नियमांत सूट मिळवावी लागेल. त्यासाठी बोर्डानं तयारी सुरू केली आहे.