कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व ( IPL 2021) २९ सामन्यानंतर स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला. या निर्णयानंतर सर्व परदेशी खेळाडू व भारतीय खेळाडू आपापल्या घरी गेले. पण, बीसीसीआय उर्वरित आयपीएल कधी व केव्हा घ्यायची याच्या तयारीला लागले. आयपीएल २०२१चे उर्वरित सामने न झाल्यास बीसीसीआयला जवळपास २५०० कोटींचं नुकसान होईल, असा अंदाज बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यांनी व्यक्त केला. हे नुकसान होऊ नये यासाठी बीसीसीआय लंडन व यूएई या दोन देशांत आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी बीसीसीआयनं भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्याची विनंती इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाकडे ( ECB) केल्याची चर्चा आहे. समालोचक हर्षा भोगले यांनी त्यासंदर्भातले ट्विट केले होते.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही आयपीएलचे सामने सुरू होते. बीसीसीआयनं खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बायो-बबल तयार केले होते, परंतु वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स यांच्या रुपानं कोरोनानं त्या बबलमध्ये शिरकाव केला. त्यानंतर अमित मिश्रा, वृद्धीमान सहा, लक्ष्मीपती बालाजी, मायकेल हसी, टीम सेईफर्ट, प्रसिद्ध कृष्णा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या सर्वांनी कोरोनावर आता मात केली आहे. पण, बीसीसीआय अजूनही आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी चाचपणी करत आहेत.
भारत-इंग्लंड दौऱ्याला कात्री?भारतीय संघ २ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. १८ ते २३ मे या कालावधीत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल ( ICC World Test Championship) न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. ४ ऑगस्टपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. बीसीसीआयनं आयपीएलचा दुसरा टप्पा लंडनमध्येच खेळवण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे त्यांनी ECBकडे भारत-इंग्लंड कसोटी मालिका जुलैमध्ये सुरू करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून त्यांना आयपीएलसाठी एक अतिरिक्त आठवडा मिळेल. शिवाय एक कसोटी सामना रद्द करण्याचाही प्रस्ताव समोर ठेवल्याची चर्चा आहे. पण, इंग्लंड क्रिकेट बोर्डानं असा कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले. ECB has received no request from the BCCI to change the schedule so 5 match Test series will go on as per schedule
इंग्लंडमध्ये आयपीएल खेळवण्याचे फायदे?
इंग्लिश कौंटी क्लबनं आयपीएल आयोजनचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवलाच आहे. त्याला इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचाही पाठिंबा आहे आणि स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणारे स्टार स्पोर्ट्स यांच्यासाठीही ते सोईचे आहे. ''लंडनमध्ये आयपीएल आयोजन स्वस्त पडेल. शिवाय लंडन सरकार क्रीडा स्पर्धांना प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देणार आहेत. त्यामुळे फ्रँचायझी मालकांना अधिक पैसा कमावता येईल. आतापर्यंत बीसीसीआयच्या डोक्यात हाच प्लान सुरू आहे,''असे सूत्रांनी TOI ला सांगितले.