लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या रद्द झालेल्या पाचव्या कसोटी सामन्याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला एक पत्र लिहिले आहे. यात या मालिकेच्या भवितव्याविषयीची निर्णयप्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्राची ईसीबीच्या प्रवक्त्यानेही पुष्टी केली आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये या मालिकेच्या भविष्याविषयी तोडगा न निघाल्यामुळे ईसीबीने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता बोलली जात आहे.
भारतीय संघ पुढच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी हा एकमेव सामना खेळवल्या जाण्याबाबत ‘ईसीबी’ आणि ‘बीसीसीआय’ सकारात्मक दिसले. मात्र, जर पुढच्या वर्षी सामना झालाच तर त्या सामन्याचा निकाल कसोटी मालिकेसाठी ग्राह्य धरावा, असे टॉम हॅरिसन यांचे म्हणणे होते. या मुद्यावर दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये सहमती न होऊ शकल्याने ईसीबीने आयसीसीकडे धाव घेतली.
अशावेळी दोन निकालांची शक्यता असू शकेल
पहिली म्हणजे हा कसोटी सामना आयसीसीच्या कोविड-१९ च्या नियमांनुसार रद्द झाल्याचे आढळून आले तर आयसीसीची वाद निवारण समिती ही मालिका इथेच संपल्याचे घोषित करू शकते. अशात भारताकडे २-१ ची आघाडी असल्याने भारताला विजेता म्हणून घोषित केले जाऊ शकते.
दुसरी शक्यता अशी की, आयसीसीच्या वाद निवारण समितीला असे आढळून आले की भारत या सामन्यात संघ उतरविण्यास असमर्थ ठरला आहे तर अशावेळी पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल आणि ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल.
- त्यामुळे हा निकाल जर भारताच्या बाजूने आला तर इंग्लंडला मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागेल.
- विमा कंपन्यांच्या कोरोना नियमानुसार जवळपास चार कोटी पौंडांच्या विम्याच्या रकमेवर इंग्लंड क्रिकेट मंडळाला पाणी सोडावे लागेल.