वेलिंग्टन : ग्लेन मॅक्सवेल आणि ॲरोन फिंच यांच्या अर्धशतकानंतर एश्टन एगर याने घेतलेल्या ६ विकेट्सच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात बुधवारी येथे न्यूझीलंडचा ६४ धावांनी पराभव करीत पाच सामन्यांची मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
मॅक्सवेलने ३१ चेंडूंत आठ चौकार आणि ५ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. तसेच फिंचने ४४ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व दोन षटकारांसह ६९ धावा केल्या. या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २०८ अशी विशाल धावसंख्या उभारली. जोश फिलिपनेदेखील ४३ धावांचे योगदान दिले. मॅक्सवेलने अवघ्या २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आपल्या खेळीदरम्यान जिमी निशामच्या एका षटकात २ षटकार व चार चौकारांसह २८ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात एगर आणि आंतरराष्ट्रीय पर्दापण करणाऱ्या रिली मेरेडिथ यांच्या धारदार गोलंदाजीसमोर आस्ट्रेलियाने न्यूझीलंडला १७.१ षटकांत १४४ धावांत गुंडाळले. एगरने ३० धावांत ६ व रिली मेरेडिथ याने २४ धावांत २ गडी बाद केले. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने पहिल्या दोन सामन्यातील अपयश मागे टाकताना अर्धशतक झळकावले. फिंचने फिलीप याच्या साथीने ८३ व मॅक्सवेलसोबत ६४ धावांची भागीदारी करीत विशाल धावसंख्या रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
संक्षिप्त धावफलकऑस्ट्रेलिया : २० षटकात ४ बाद २०८ धावा (मॅक्सवेल ७०, फिंच ६९, फिलिपे ४३) गोलंदाजी : ईश सोढी २/३२, साऊदी १/३७, बोल्ट १/३९. न्यूझीलंड : १७.१ षटकात सर्व बाद १४४ धावा (गुप्तिल ४३, कॉनवे ३८) गोलंदाजी : एश्टन एगर ६/३०, मेरेडिथ २/२४.