नवी दिल्ली: अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने टीम इंडियाच्या खेळाडूंमधील अहंकाराच्या समस्येबाबत सोमवारी मोठा खुलासा केला. आपण दीर्घकाळ एकत्र राहतो तेव्हा अहंकार असणे सामान्य बाब असल्याचेही त्याने नमूद केले.
धवन सध्या भारतीय संघाबाहेर आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेपासून त्याला संघात स्थान मिळालेले नाही. २०२३च्या विश्वचषकात त्याची निवड होणे कठीण दिसते. एका मुलाखतीदरम्यान धवनला टीम इंडियातील खेळाडूंच्या अहंकाराबद्दल विचारण्यात आले.
यावर उत्तर देताना तो म्हणाला, ‘अहंकाराचा संघर्ष ही एक मानवी गोष्ट आहे. आम्ही जवळपास २२० दिवस एकत्र राहतो. कधी कधी लोकांमध्ये गैरसमज होतात. हे खेळाडूंच्या बाबतीतही घडते. मी रोहित शर्मा किंवा विराट कोहलीबद्दल बोलत नाही. अहंकार असणे ही एक सामान्य बाब आहे.’
‘जेव्हा लोक एकमेकांसोबत इतका वेळ घालवतात तेव्हा अशा गोष्टी घडणे स्वाभाविक आहे. आमच्याकडे ४० लोकांची टीम आहे त्यात सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापनाचाही समावेश आहे. जेव्हा तुम्ही कोणासोबतही आनंदी नसाल तेव्हा काही भांडणे आणि मतभेद होऊ शकतात. मात्र सामान्यपणे प्रेम आणि मैत्रीभाव कायम असतो.’