तुम्ही आमच्या फलंदाजीवर टीका करू शकता. आरसीबीच्या फलंदाजीमध्ये सातत्य नाही, असे म्हणता येईल. तुम्ही आमच्या गोलंदाजीवरही टीका करू शकता. मोक्याच्या क्षणी या विभागात नियंत्रण राखता आले नाही, असेही म्हणता येईल. एवढेच काय तुम्ही आमच्या क्षेत्ररक्षणावरही टीका करू शकता. क्षेत्ररक्षण सुमार असल्याचे तुम्ही म्हणू शकता. पण आरसीबीने फार पूर्वीच पराभवासाठी कुठल्याही कारणाचा आधार घेणे सोडलेले आहे.दरम्यान, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आमच्या प्रतिबद्धतेवर मात्र कुठले प्रश्नचिन्ह लावता येणार नाही. आता आम्ही मोहालीमध्ये आहोत. यंदाच्या मोसमात पंजाब आपल्या गृहमैदानावर एकाही लढतीत पराभूत झालेला नाही. त्यांनी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व सनरायजर्स हैदराबाद यांना नमवले, पण प्रत्येक बाबीचा कधीना कधी शेवट होतोच.पंजाबचे दोन्ही सलामीवीर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल स्पर्धेतील अव्वल पाच फलंदाजांमध्ये आहेत. मोहम्मद शमी व कर्णधार रविचंद्रन अश्विन यांच्यामुळे या संघाच्या गोलंदाजीच्या बाजूचा समतोल साधला आहे. आम्हाला या लढतीच्या तयारीसाठी जवळजवळ सहा दिवसाचा अवधी मिळाला आहे. या कालावधीत आम्ही आपली मोहीम योग्य मार्गवर आणण्यासाठी कसून मेहनत घेतली. प्रशिक्षक गॅरी कस्टर्न आणि कर्णधार विराट कोहली यांनी सातत्याने संघात नवी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व खेळाडू एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे जुळले आहेत. स्पर्धेतील आतापर्यंतच्या आमच्या कामगिरीमुळे आमचे समर्थक निराश झाले आहेत, पण प्रवास करताना, भोजन करताना व एकमेकांसोबत वेळ घालविताना आरसीबीच्या खेळाडूंकडे बघतो त्यावेळी हा एक प्रतिभावान संघ असून लवकरच सूर गवसेल, असे वाटते.ही बाब ऐकायला चांगली वाटते, पण शेवटी कामगिरीच आम्हाला या दुष्टचक्रातून बाहेर काढू शकते. वैयक्तिक रुपाने आम्हाला दडपणाखाली चांगली कामगिरी करणे, एकजुटीने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याची गरज आहे. विजयाची भूक दिसणे आवश्यक आहे. होय, आम्ही सलग ६ सामने गमावले आहेत, पण अद्याप आमच्याकडे ८ सामने शिल्लक आहेत. आम्हाला आमची क्षमता सिद्ध करण्यासाठी व आम्ही काय करू शकतो, हे दाखविण्यासाठी आठ संधी आहेत. या संधीतून आम्ही आपल्या समर्थकांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. आशा आहे की, हा सामना आमच्यासाठी आनंदाचे ‘सातवे आसमान’ ठरेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आमची क्षमता दाखविण्याच्या आठ संधी
आमची क्षमता दाखविण्याच्या आठ संधी
एबी डिव्हिलियर्स लिहितात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 5:23 AM