मुंबई : क्रिकेटमध्ये विक्रमांना फार महत्त्व आहे. या खेळात अनेक विक्रम बनतातही आणि तुटतातही. कधीकधी अशा विक्रमांची नोंद होते, त्याचा कोणी विचारही केला नसेल. असाच एक विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात विराटने 140 धावांची धडाकेबाज खेळी केली. कर्णधार म्हणून त्याचे हे 14 वे शतक होते.
पाकच्या आठ कर्णधारांना मिळून जी कामगिरी करता आली नाही ती विराटने एकट्याने करून दाखवली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत केवळ आठ कर्णधारांना शतकं झळकावता आली आहेत. एकूण 28 खेळाडूंनी पाकिस्तान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. पाकिस्तानकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक 3 शतकं अजहर अलीच्या नावावर आहे. त्यानंतर इंझमाम-उल-हक आणि शाहिद आफ्रिदी ( प्रत्येकी 2 ), शोएब मलिक, सइद अनवर, आमीर सोहेल, रमीझ राजा आणि इम्रान खान ( प्रत्येकी 1 ) यांचा क्रमांक येतो. या कर्णधारांच्या शतकांची बेरीज केल्यास ती 12 होते.