शरद पवार हे कधी काय करतील याचा नेम नाही, म्हणतात त्याचा प्रत्यय नुकत्यात झालेल्या एमसीएच्या निवडणुकीत आला. राज्यात मविआ सरकार घालविण्यावरून भाजपावर टीका करणाऱ्या पवारांनी थेट भाजपासोबतच हातमिळवणी करत अशिष शेलारांना पाठिंबा दिला. यातच बुधवारच्या रात्री मुंबईत पवारांची डिनर डिप्लोमसी त्याहून चर्चेचा विष्य ठरली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी मुंबईत एक खास डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. बीसीसीआयच्या खजिनदारपदी निवड झालेले भाजपचे आशिष शेलारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार भाजपच्या नेत्याला पाठिंबा देत आहेत.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेही निवडणूक लढवत असून पवार आणि शेलार यांनी स्थापन केलेल्या पॅनलमधून उमेदवारी दाखल केली आहे. पवार आणि शेलार पॅनलने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ही डिनर पार्टी केली. यावर बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना व काँग्रेसला कोपरखळी मारली. पवार, फडणवीस आणि शेलार एकाच व्यासपीठावर आहेत... यामुळे काही लोकांची झोप उडू शकते. पण राजकारण करण्याची ही जागा नाही. आपण सगळेच क्रिकेटचे चाहते आणि समर्थक आहोत; त्यामुळेच खेळासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या राजकीय मतभेदांची पर्वा न करता विकास करा, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
तर दुसरीकडे शरद पवार यांनी, राजकीय विचारसरणी वेगळी असली तरी खेळाबाबत आमचे विचार समान आहेत, असे सांगितले. जेव्हा मी बीसीसीआय अध्यक्ष होतो, नरेंद्र मोदी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. ते बैठकांना यायचे. सध्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे हिमाचल प्रदेशमधून यायचे. आम्ही सारे एकत्र यायचो कारण आवड एक होती, असे पवार म्हणाले.