मुंबई : प्रशासकांच्या समितीच्या (सीओए) मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या (नाडा) कक्षेत येणे आणि बोर्डाच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.गेल्या आठवड्यात बीसीसीआयने नाडाच्या कक्षेत येण्यास सहमती दर्शविल्यानंतर सीओएची ही पहिलीच बैठक आहे. या बदलाला बीसीसीआयच्या घटनेमध्ये कसे स्थान द्यायचे, यावर सीओए सदस्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.अनेक वर्षे नकार दिल्यानंतर बीसीसीआयने नवी दिल्ली येथे क्रीडा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले सीईओ राहुल जोहरी यांच्या बैठकीनंतर गेल्या शुक्रवारी नाडाच्या कक्षेत येण्यास सहमती दर्शवली.डोपिंगबाबत ‘शून्य सहिष्णुता’ नीतीमुळे सीओए या मुद्यावर प्रदीर्घ चर्चा करू शकतात, असे मानल्या जात आहे. सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांच्याव्यतिरिक्त डायना एडुल्जी आणि लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) रवी थोडगे यांचा समावेश आहे. समिती राज्य संघटनांच्या निवडणुकांबाबत आणि त्यानंतर होणाºया बीसीसीआयच्या निवडणुकीबाबतच्या स्थितीची माहिती घेईल. बीसीसीआयची निवडणूक २२ आॅक्टोबर रोजी होणार आहे.किती राज्य संघटनांनी लोढा समितीच्या शिफारशींचा स्वीकार केला आणि अद्याप किती संघटना याचे पालन करीत नाही, याबाबत समिती आकलन करणार आहे.राज्य संघटनांना सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एक आणखी मुद्दा ज्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यात पुरुष राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या उमदेवारांची मुलाखतीसाठी निवड करण्याचा समावेश आहे. माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) मुख्य प्रशिक्षक पदासाठी मुलाखत घेणार आहे. या पदासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यानंतर, सीओए मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याची शक्यता आहे. मुलाखती १६ आॅगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याव्यतिरिक्त भारताचे माजी खेळाडू लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग व न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन या पदाच्या दावेदारांमध्ये आहेत. (वृत्तसंस्था)